मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आमरण उपोषणा संदर्भात जामखेड तालुक्यातून वाढता पाठिंबा
तालुक्यातील गावा गावात होत आहेत नियोजन बैठका
जामखेड प्रतिनिधी
मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांचे सुरू होणारे आमरण उपोषण तसेच अंतरवाली सराटी येथून निघणाऱ्या पायी पदयात्रेत सामील होण्यासाठी जामखेड तालुक्यात मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने गावोगावी नियोजन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज सकाळी व संध्याकाळी दोन ते तीन गावांमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.
जामखेड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयक प्रत्येक गावात जाऊन वीस तारखेच्या मुंबई येथील आमरण उपोषण संदर्भात व मराठा समाजास आरक्षण मिळावे यासंदर्भात गावोगावी जाऊन समाजाचे प्रबोधन व नियोजन या संदर्भात मार्गदर्शन करत आहेत व मराठा समाजाच्या सर्व नागरिकांशी संवाद साधत आहेत. यामध्ये आज जवळा गावामध्ये एसटी स्टँड च्या जवळ ही नियोजन बैठक घेण्यात आली. जवळा गावातील शंभर मराठा तरुण कार्यकर्ते या नियोजन बैठकीस उपस्थित होते. जामखेड हून या नियोजन बैठकीसाठी प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, पवन राळेभात, सोले दाजी, राम निकम, अवधूत पवार आदी मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी या पदयात्रेतील व उपोषणातील सर्व नियोजन आणि करावयाची कार्यवाही त्याचबरोबर त्या ठिकाणी घेऊन जाण्याच्या साहित्याची सर्व माहिती देण्यात आली. मुंबई या ठिकाणी किमान 40 दिवस उपोषणास थांबावे लागेल या नियोजने आपण सर्वांनी आपला दररोज खाण्याचा शिधा, अंथरून, पांघरून, इतर सुकामेवा आदीवस्तू घेऊन या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे. त्याचबरोबर प्रत्येकाने शांततेच्या मार्गाने व अहिंसात्मक मार्गाने कोणालाही आपल्याकडून त्रास होणार नाही अशा प्रकारे आपण सर्वांनी तन-मन धनाने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यापूर्वी देवदैठण, धामणगाव, जातेगाव, तेलंगशी, घोडेगाव, पिंपळगाव आळवा व आज शिऊर अशा विविध गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद या बैठकांना मिळाला आहे. आज जवळा गावामध्ये सुमारे शंभर मराठा बांधव या बैठकीस उपस्थित होते व दहा पिक अप वाहने या गावातून निघण्याची सर्व गावकऱ्यांनी तयारी दर्शवली. आंतरवाली सराटी येथून निघणाऱ्या पायी पदयात्रेत जामखेड तालुक्यातील समाज बांधव अहमदनगर येथे सहभागी होत आहेत आजपर्यंत जामखेड येथे जरांगे पाटील यांची विराट सभा, राज्यात आदर्श ठरावे असे सलग 62 दिवस साखळी उपोषण, महिलांचा कॅन्डल मार्च, महिलांचा रस्ता रोको ही आंदोलने शांततेच्या व शिस्तबद्ध पद्धतीने झाली. त्याच पद्धतीने पायी पदयात्रेचे नियोजन करण्यात येणार आहे.यावेळी देवदैठण तेलंगशी जातेगाव घोडेगाव पिंपळगाव आळवा धामणगाव व जवळा येथील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगितले.