आ. प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सारोळा येथे घेण्यात आलेल्या तपासणी शिबिरात 350 रुग्णांनी घेतला लाभ
अजय (दादा) काशिद यांच्या वतीने व समर्थ हॉस्पिटल च्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते शिबीर
जामखेड प्रतिनिधी
आ. प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, सारोळा गावात सर्व रोग निदान शिबीर व मोफत औषधोपचार या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन भाजपा तालुका अध्यक्ष अजय (दादा) काशिद यांच्या वतीने दि. 3 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले होते. सदर शिबीराचा 350 गरजू ग्रामस्थांनी लाभ घेतला.
या शिबिरात गुडघेदुखी, पाठदुखी, मणक्याचे आजार, मानदुखी, अपेंडिक्स, हर्निया, मुळव्याध भगंदर, मुतखडा, प्रोस्टेट, संधिवात, आमवात, मधुमेह, रक्तदाब, अर्धांगवायु व सर्व प्रकारचे त्वचाविकार या आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी समर्थ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथील तज्ञ डॉक्टर टीम डॉ. भरत दारकुंडे, डॉ. अमोल भगत व डॉ. श्रीनिवास लांब (नागरगोजे) यांनी वैद्यकीय सेवा देण्याचे कर्तव्य बजावले.
आ. प्रा .राम शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त सन्मान सौ. रितूताई व अजयदादा काशिद यांच्या वतीने करण्यात आला. तसेच सारोळा गावात गेल्या सात दिवसापासून सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहास मा.राम शिंदे साहेब यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना, राम शिंदे साहेब यांनी सारोळा गावाचे सरपंच श्री.अजयदादा काशिद यांच्या कार्यकाळातील झालेल्या विविध विकासकामांचे कौतुक केले.
अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठापना दिन अर्थातच दि.22 जानेवारी 2024 हा दिवस सर्वांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात यावा असे अहवान केले.तसेच सारोळा गावाने अडचणीच्या काळात मला भरभक्कम आधार व पाठींबा दिला.त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचा आभारी आहे आणि सारोळा गावाच्या भविष्यातील सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचा आशावाद यावेळी प्रा.राम शिंदे साहेब यांनी व्यक्त केला. या वेळी अयोध्या येथे गेलेल्या सारोळा गावातील 30 कारसेवकांचा प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते प्रभु श्रीरामचंद्राची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी सारोळा गावातील महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.