जामखेड प्रतिनिधी
जवळा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कर्जदार सभासदांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी संकरित गायीसाठी तसेच नवीन व बिगर कर्जदार सभासदांना रब्बी पीक कर्जासाठी जिल्हा सहकारी बँकेकडून संचालक अमोल (दादा) राळेभात यांनी कर्ज मंजूर करून घेतले. जवळा संस्थेच्या कार्यालयात संचालक अमोल (दादा) राळेभात यांच्या हस्ते संकरीत गाया घेणेसाठी चेक वितरित करण्यात आले. तसेच १२९ नवीन सभासदांचे पीक कर्ज केसीसी खाती जमा करण्यात आले.
जवळा सोसायटी ही जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी संस्था असून या संस्थेचे ३०६० सभासद आहेत. संस्थेच्या कर्जदार सभासदांना १६ कोटी २६ लाख रु.कर्ज वाटप केलेले आहे. तसेच संस्थेने मागणी केलेल्या नवीन १२९ सभासदांना पीक कर्जासाठी ७५ लाख ९७ हजार तर १० सभासदांना संकरीत गायीसाठी २४ लाख रु.कर्ज मंजूर केले असल्याची माहिती बँकेचे संचालक श्री.अमोल दादा राळेभात यांनी दिली. जिल्हा बँक नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून बँकेच्या विविध कर्ज योजनेच्या माध्यमातून अत्यंत अल्प दरामध्ये कर्ज सुविधा उपलब्ध करून देत आहे. बँकेमध्ये कर्मचारी संख्या कमी असतानाही बँकेचे काम अत्यंत सुरळीत व वेळेत पूर्ण केले जात आहे.कर्ज वसूली ही संस्थेचा व बँकेचा कणा असून ज्याप्रमाणे आपण कर्ज घेतो. त्याप्रमाणे घेतलेले कर्ज फेडणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना शासनाकडून व्याज सवलत दिली जाते.त्यामुळे घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करून शासनाच्या व्याज सवलत रकमेचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.










