बांधखडक येथिल विविध गुणदर्शन स्पर्धेत १४ बक्षिसे जिंकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले विद्यार्थ्यांचे कैतुक.
जामखेड प्रतिनिधी
शिऊर येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत बांधखडक जि. प. शाळेतील १४ गुणवंत विद्यार्थ्यांनी बक्षिसे जिंकली. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी कैतुक करत सत्कार केला. तसेच गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी देखील या विद्यार्थ्यांचे कैतुक.
महाराष्ट्र शासनाच्या स्व. आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनांतर्गत विविध शासकीय उपक्रम तसेच लोकसहभागातील कामांची पाहणी करण्यासाठी मंगळवार दि. २ जानेवारी २०२४ रोजी श्रीगोंदा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी राणी फराटे यांनी बांधखडक शाळेला भेट दिली. यावेळी नुकत्याच शिऊर येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत वक्तृत्व, कथाकथन, वैयक्तिक गायन, सुंदर हस्ताक्षर, वेशभूषा सादरीकरण, समूहगीत गायन व सांस्कृतिक (नृत्य, नाट्य) या स्पर्धांत विविध गटांतून प्रथम क्रमांकाची ६, द्वितीय क्रमांकाची ६ आणि तृतीय क्रमांकाची २ अशी तब्बल १४ बक्षिसे जिंकणाऱ्या बांधखडक शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा श्रीम.फराटे यांनी सत्कार करत त्यांच्याशी सुसंवाद साधला व शाळेचे अभिनंदन केले.










