याबाबत माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील सातेफळ येथील इयत्ता नववीत शिकणारा हरी अशोक मोरे वय 16 वर्षे या एकुलत्या एक मुलाचा घराजवळील झाडाला बांधलेल्या वायरला हात लागून विजेचा धक्का बसला असता त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला असल्याने सातेफळ व खर्डा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
खर्डा येथे सहा कोटी रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधून झाली आहे. फक्त उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला हा दवाखाना फक्त शोभेची वस्तू बनला आहे, या ठिकाणी साप चावल्यावर, विजेचा धक्का बसल्यावर तसेच पाण्यात बुडल्यावर वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर नसणे, इंजेक्शन उपलब्ध नसणे, आरोग्य कर्मचारी संख्या कमी असल्याने व तातडीची कोणतीही आरोग्यसेवा पेशंटला मिळत नसल्याने आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
यापूर्वीही वंजारवाडी येथील खोत, बाळगव्हाण येथील शिकारे व आज सातेफळ येथील हरी मोरे या युवकांचा एक महिन्याच्या अंतराने विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे अशा घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत सामाजिक प्रबोधन होऊन होणाऱ्या घटना टाळण्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची जनतेतून मागणी होत आहे.
दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी हरी अशोक मोरे या शालेय विद्यार्थ्यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या मागे आई-वडील, बहिण, आज्जी, दोन चुलत भाऊ, एक चुलता असा परिवार आहे.