मराठा आरक्षणासाठी सुरू आसलेल्या साखळी उपोषणास त्रिदल माजी सौनिक सेवा संघाचा पाठिंबा
आज राजेवाडी येथील मराठा बांधवांचा साखळी उपोषणात सहभाग
जामखेड प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून जरांगे पाटिल हे आमरण उपोषण बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण लागु करण्यासाठी जामखेड येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणात तालुक्यातील राजेवाडी येथील मराठा बांधव व भजनी मंडळ यांनी सहभाग घेतला. या साखळी उपोषणास जामखेड येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने पाठींबा देण्यात आला.
यावेळी बोलताना कॅप्टन लक्ष्मण भोरे म्हणाले की, त्रिदल आजी-माजी सैनिक संघटना सामाजिक, धार्मिक कार्यात नेहमीच तत्पर असते. आमच्या सैनिकाना कोणतीही जात नसते. आम्ही सर्व सैनिक जातीय सलोखा राखुन असतो. मानवता हीच आमची जात असते. त्याच प्रमाणे आमचा झेंडाही कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही रंगाचा नसतो तर सैनिकांचा झेंडा तिरंगाच असतो. त्यामुळे कोणताही भेदभाव न ठेवता आम्ही सैनिक मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढणारा इतिहास घडविणारा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना आपल्या जामखेड पंचक्रोशीतील सर्व त्रिदल आजी माजी सैनिक परीवाराच्या वतीने जाहीर पाठींबा देत आहोत.
यानंतर जामखेडचे तहसिलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना तसेच उपोषणकर्त्यांही पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, सचिव शहाजी ढेपे, कोषाध्यक्ष राजकुमार भराटे, सल्लागार सुग्रीव अडाळे, मार्गदर्शक अरविंद जाधव, संचालक अशोक चव्हाण, सदस्य जगन्नाथ धर्माधिकारी, रमेश मोरे, काशिनाथ शिंदे, अंजुम शेख, नानासाहेब कार्ले, केशव ननवरे, नवनाथ अंधळे, मुस्तफा शेख, दत्तात्रय डिसले, विजय लेकूरवाळे, विठ्ठल लेकूरवाळे, रावसाहेब कापसे, रामा गोरे आदी आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. राजेवाडी येथील मराठा बांधवांचा साखळी उपोषणात सहभाग घेतला दिवसभर या ठिकाणी राजेवाडी ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या वतीने भजन करत आंदोलन करण्यात आले.