मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकत्याची छगन भुजबळ यांना कायदेशीर नोटीस
आरक्षणाच्या हक्कासाठी लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. अनेक मराठा बांधव यांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. मराठा समाजाची चेष्टा करणारे वक्तव्य करत आहेत. त्यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा कायदेशीर लढाईला सामोरे जावे असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे.
मराठा समाजाबद्दल खोटे व अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल तसेच मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याबद्दल काळे यांनी मंत्री भुजबळ यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे. या नोटीसद्वारे मंत्री भुजबळांना इशारा देण्यात आला आहे.
काळे यांच्या वतीने ॲडव्होकेट अतुल पाटील यांनी पाठवलेला नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी शहरात आमरण उपोषण केले होते. उपोषणाने तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. समाज बांधवांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे. मात्र महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या मंत्री या पदावर काम करताना या प्रश्नाबाबत छगन भुजबळ गंभीर नाहीत. मराठा समाज बांधवांचे आंदोलन कोणत्याही जातीच्या किंवा व्यक्तीच्या विरुद्ध नाही. तरी देखील गेल्या काही दिवसांपासुन मंत्री भुजबळ हे मराठा आणि ओबीसी या दोन समूहात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये करत आहेत.

१४ ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटी, (ता. अंबड, जि. जालना) येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदरची सभा ही कोणत्याही पक्षाने अथवा नेत्याने आयोजित केलेली नाही. या सभेसाठी कोणीही कसलीही वर्गणी मागितली नसून कोणतेही प्रायोजकत्व घेतलेले नाही. ही बाब संपूर्ण राज्याला माहित असताना देखील या सभेबद्दल कुचेष्टा करणारी व मराठा समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये मंत्री भुजबळ यांनी केली आहेत.
त्यामुळे कुचेष्टा करणारी व समस्त मराठा समाजाच्या भावना दुखावणारी केलेली वक्तव्ये त्वरित मागे घेऊन सकल मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी सतीश काळे यांचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अतुल पाटील यांनी नोटिसद्वारे केली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईची करू,असे आवाहन काळे यांनी नोटिसद्वारे केले आहे.










