जामखेड तालुक्यातील बावी ग्रामपंचायतचे सरपंच निलेश पवार यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बहुमताने मंजुर
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील बावी ग्रामपंचायतचे सरपंच निलेश पवार यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजुर झाला आहे.
ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, महिला सदस्यांना सन्मान न देणे, मनमानी कारभार करणे, गैर कारभार करणे असे अनेक आरोप करत जामखेड तालुक्यातील बावी गावचे सरपंच निलेश दादासाहेब पवार यांच्याविरोधात उपसरपंच दादासाहेब मंडलिक, ग्रामपंचायत सदस्य महादेव पोपट कारंडे, प्रियंका गणेश पवार, मनिषा सुनिल कारंडे, सुनिता नानासाहेब कवादे, बायमाबाई गुलाब मंडलिक या ६ सदस्यांनी २१ सप्टेंबर २०२३ रोजी जामखेड तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला होता.
या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी काल दि. २६ सप्टेंबर २०२३ रोजी बावी ग्रामपंचायत मध्ये सर्वसाधारण सभा बोलावण्यात घेण्यात आली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे हे होते. यावेळी अविश्वास ठरावावर चर्चा झाली. यावेळी सर्व सात सदस्य सभेस उपस्थित होते. यावेळी अविश्वास ठरावातील चर्चा होऊन झालेल्या मतदानानुसार सरपंचाविरोधात सहा सदस्यांनी हात वर करून मतदान केले. त्यानुसार ६ विरूध्द १ असा बहुमताने अविश्वास ठराव पारित झाला. यावेळी ग्रामसेवक रफिक तांबोळी, तलाठी दिनेश वासते, शिपाई अशोक राऊत हे यावेळी उपस्थित होते.






