पुणे जिल्ह्यानंतर जामखेड शहरात झळकले आ. रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री बॅनर
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगाने घडामोडी बदलत आहेत. राज्याच्या राजकारणात दबदबा आसलेल्या पवार कुटुंबातील उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार सुप्रिया सुळे यांच्या नंतर कर्जत जामखेड मधुन पहिल्यांदाच निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून मतदार संघातील जामखेड शहरात बॅनर लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे. पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आ. रोहित पवार यांचा दि २९ सप्टेंबर २०२३ रोजी वाढदिवस आहे. त्यामुळे जामखेड शहरात वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. रोहित पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. जामखेड शहरातील बीड रोडवर आ. रोहित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आ. रोहित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले आहेत .
पुणे जिल्ह्य़ात देखील झळकले होते आ.रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री बॅनर.
पुणे जिल्ह्यातील मावळ येथील टोलनाक्यावर हे बॅनर लागले आहेत. पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसर अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, सध्या पिंपरी-चिंचवड शहरात आमदार रोहित पवारांनी लक्ष घातलं असून, दौरे करायला सुरुवात केलीय. आमदार रोहित पवारांचा 29 सप्टेंबरला वाढदिवस असल्यामुळं मावळातील उर्से टोलनाक्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावले आहे. या बॅनरमध्ये त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.