तिहेरी हत्याकांडानं नगर जिल्ह्य़ात खळबळ, पत्नी, मेव्हणा व आजे सासूची निर्घृणपणे केली हत्या; हल्ल्यात तिघे गंभीर जखमी
अहमदनगरः तिहेरी हत्याकांडाने अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. जावयाने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार शिर्डीत घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. दरम्यान तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला नाशिकमधून अटक केली आहे.
शिर्डीजवळील सावळीविहीर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने धारदार शस्राने वार करत तिघांची निर्घृण हत्या केली आहे. तर सासू, सासरे आणि मेव्हणी यांच्यावरही हल्ला करुन आरोपीने त्यांना गंभीर जखमी केले आहे. जखमींवर शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जावई सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिर्डी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनं सावळीविहीर गावात खळबळ उडाली आहे.
कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये पत्नी वर्षा सुरेश निकम (वय 24), मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाड (वय 25), आजे सासू हिराबाई द्रौपद गायकवाड (वय 70) या तिघांचा समावेश आहे. तर सासरे चांगदेव द्रोपद गायकवाड (वय 55), सासू संगीता चांगदेव गायकवाड (वय 45), मेव्हणी योगिता महेंद्र जाधव (वय 30) हे तीन जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
हल्ला केल्यानंतर दोन्हीही आरोपी नाशिकच्या दिशेने पसार झाले होते. दरम्यान, नगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेला आरोपींचे लोकेशन मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शेळके, पोलिस उपनिरीक्षक रामदास विंचू यांना याबाबतची माहिती दिली. नाशिक रोड पोलिसांनी तातडीने पावले उचलत नाशिक-पुणे रोड वरील शिंदे गाव टोल नाक्याजवळ सापळा रचून मोटारसायकल वरून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या आरोपी सुरेश निकम आणि रोशन निकम या दोघांना ताब्यात घेतले.
या दोघांनी हल्ला केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्यासह नाशिक रोड येथे पोहचत, दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांवर हल्ला आणि त्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.