मराठा आंदोलनाची ठिणगी पडलेल्या कोपर्डीत आजपासून पुन्हा आंदोलन सुरू

कर्जत : ज्या कोपर्डी गावातील घटनेपासून मराठा आंदोलनाची सुरवात झाली, त्या कोपर्डी गावात पुन्हा एकदा लढ्याचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कोपर्डीत आज मंगळवार ५ सप्टेंबर पासुन ग्रामस्थ उपोषणला बसले आहेत. याला जोडूनच कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा आणि दुष्काळ निवारण उपय योजनांसारख्या मागण्यांचाही समावेश आंदोलनात करण्यात आला आहे.

सुमारे सहा वर्षांपूर्वी कोपर्डीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेनंतर राज्यभर खळबळ उडाली होती. यातील आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरूद्ध खटला सुरू आहे. सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षाही दिली आहे. मात्र, वरच्या न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही.

कोपर्डीतील घटनेनंतर मराठा आंदोलन सुरू झाले. सुरुवातीला गावात आणि कर्जत तालुक्यात या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन झाले. त्यातूनच पुढे मराठा क्रांती मोर्चा स्थापन होऊन छत्रपती संभाजीनगरपासून आंदोलनास सुरवात झाली. त्यात कोपर्डीच्या घटनेच्या निषेधासह मराठा समाजाच्या अन्य मागण्याही मांडण्यात आल्या. तेथून पुढे मराठा आरक्षणाची मागणी अधोरेखित होत राज्यभर सकल मराठा समाजाच्या बॅनरखाली ठिकठिकाणी शांततामय मार्गाने मोर्चे निघाले.

जालन्यातील घटनेचे राज्यभर पडसाद उमटत असताना आता कोपर्डीतही आंदोलन सुरू झाले आहे. आज मंगळवारपासून गावात चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी तहसिलदारांना निवेदन देऊन याची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे, मराठा समाज अतिशय मागासलेला आहे. अनेक समाज्याच्या नेत्यांनी १९८० पासून मराठा समाज्याला आरक्षणाची मागणी केलेली आहे. १३ जुलै २०१६ रोजी कोपर्डी अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर मराठा समाज ३५० वर्षांनंतर लाखोच्या संख्येने मराठा समाज मोर्च्याच्या निमित्ताने एकत्र आला.

त्यामध्ये मराठा सामाजाने अनेक मागण्या केल्या. त्याला तत्कालीन सरकारने अनेक वेळा खोटी आश्वासने देऊन मराठा समाज्याच्या तोंडाला पाने पुसली. आता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू असताना आंदोलकांवर लाठीमार झाला. याचा आम्ही निषेध करीत आहोत. यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, कोपर्डीतील निर्भयाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी. निकाल लागून सहा वर्षे झाली तरी अंमलबजावणी प्रलंबित आहे. याशिवाय कर्जत तालुक्यात दुष्काळ पडला आहे. कर्जत तालुक्यात पाण्याचे टँकर सुरू करावेत. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, अशा मागण्यांसाठी ग्रामस्थांनी ५ सप्टेंबरपासून चक्री उपोषण सुरू केले आहे. गावातील पदाधिकारी लालासाहेब सुद्रिक, हिश्चंद्र सुद्रिक, भाऊसाहेब सुद्रिक, नानासाहेब सुद्रिक, नितीन सुद्रिक, संजय सुद्रिक, सुभाष सुद्रिक, शांतिलाल सुद्रिक यांच्या यावर सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here