

शेवगावात भरवस्तीत चोरट्यांचा सशस्त्र दरोडा, हल्यात कुटुंबातील दोघांचा मृत्यू, महिला जखमी
अहमदनगर : शेवगाव येथील बालाजी मंदिराच्या समोर भर वस्तीत वास्तव्यास असलेल्या बलदवा कुटुंबीयांच्या घरावर शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास दरोडा पडला. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे.

अहमदनगर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनचे उपाध्यक्ष गौरेश बलदवा यांच्या मातोश्री पुष्पाताई बलदवा व चुलते गोपीकिसन बलदवा यामध्ये ठार झाले. तर एक महिला जखमी झाली. दरोडेखोरांनी महिलेला वीट फेकून मारल्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम झाली. या घटनेने शेवगाव सह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बालदवा यांच्या एका मित्राने गावाला जायचे म्हणून काही रक्कम त्यांच्याकडे ठेवण्यासाठी दिली होती. चोरांनी तीही नेली. पाळत ठेवून हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमीना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीच्या शोधासाठी पोलीस रवाना झाले आहेत.

नेमकं काय घडलं?
शेवगाव येथील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगाकिशन बलदवा (वय ५५ वर्ष) यांच्या शेवगाव शहरातील बाजारपेठेमधील राहत्या घरावर रात्री तीन ते चार वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी दरोडा टाकला. त्यामध्ये गोपीकिशन बलदवा व त्यांच्या मोठ्या भावजय पुष्पा हरिकिशन बलवा (वय ६५ वर्ष) या दोघांचा या दरोड्यामध्ये मृत्यू झाला. त्याचबरोबर गोपीकिशन यांच्या पत्नी सुनिता बलदवा घटनेमध्ये जखमी झाल्या आहेत.







