

असभ्य भाषा राज्यकर्त्यांना शोभत नाही, संबंधित पक्षाच्या नेत्यांनी अशा लोकांना आवर घालावा : प्रा. राजेंद्र पवार
जामखेड प्रतिनिधी :सरकारमधील लोक वाचाळवीरांच्या भूमिकेत वावरत असून, त्यांच्या तोंडी असलेली भूमिका ही तेढ निर्माण करणारी आहे.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे लटकतांना दिसून येत आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना धमकी येते. ही निंदनीय निषेधार्थ बाब आहे. वाचाळ भाषा वापरणाऱ्या राजकीय लोकांच्या पक्षातील वरिष्ठांनी त्यांना आवर घालावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यापुढे वात्रट एकेरी भाषा खपवून घेणार नाहीत. असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

खा. शरद पवार हे राज्याच्या व देशाच्या राजकारणात कधी किंगमेकर तर कधी किंग राहिले आहेत. तसेच महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात मोठं आदराचं राष्ट्रीय राजकारणात आढळ नाव आहे. राजकारणातपूरतेच मर्यादीत नसुन कृषी, कला, क्रिडा विविध क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या तालमी तयार झालेले बहुआयामी, सुसंस्कृत नेतृत्वावर बोलताना विरोधी पक्षाच्या लोकांनी त्यांचे वय व योगदानाचे भान ठेवून बोललं पाहिजे. असभ्य भाषा राज्यकर्त्यांना शोभत नाही. महाराष्ट्र साधूसंतांची पावन भुमी आहे. राजकारणात, समाजकारणात मतभिन्नता मतभेद हे पुर्वीपासुनच चालू आहे. मात्र अलिकडच्या राज्यकर्त्यांना याचा विसर पडू लागला आहे. विकास संपन्न, सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्याची जबाबदारी सर्वाचीच त्यामुळे संबंधित पक्षाच्या नेत्यांनी अशा लोकांना वेळीच आवर घालावा असेही मत राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.








