‘पाचाट’ कादंबरी ग्रामीण साहित्यविश्वात नावलौकीक मिळवेल-दत्ता बारगजे

परशुराम नागरगोजे लिखित ‘पाचाट’ कादंबरीचे जामखेड येथे प्रकाशन

जामखेड प्रतिनिधी

“जामखेड ही साहित्य व कलाप्रेमींची तसेच लेखकांची व चित्रपट निर्मात्यांची भूमी आहे. साहित्यिक कार्यक्रमाला किंवा पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला एवढा मोठा जनसमुदाय मी प्रथमच पाहत आहे. या गर्दीवरुन असे वाटते की परशुराम नागरगोजे यांची ‘पाचाट’ ही कादंबरी साहित्यक्षेत्रात मोठा नावलौकीक मिळवेल असा विश्वास वाटतो.” आसे मत ज्येष्ठ समाजसेवक दत्ता यांनी व्यक्त केले.

योगिराज प्रकाशन, आळंदी देवाची प्रकाशित आणि परशुराम नागरगोजे लिखित ‘पाचाट’ या कादंबरीचा भव्य प्रकाशन समारंभ मंचर येथील संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. ज्ञानेश्वर थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व थोर समाजसेवक दत्ता बारगजे संस्थापक अध्यक्ष, इन्फंट इंडिया, आनंदग्राम ,पाली जि.बीड यांच्या शुभहस्ते श्रीराम मंगल कार्यालय, जामखेड येथे रविवार दि. १४ मे २०२३ रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जामखेड शहर व पंचक्रोशीतील साहित्यप्रेमी, ग्रामस्थ,पत्रकार व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर पुस्तक प्रकाशन समारंभ पार पडला.

याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक दत्ता बारगजे म्हणाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले डॉ.ज्ञानेश्वर थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विचार मांडले, ” ऊसतोड कामगारांच्या समस्या, जगण्याचा जीवघेणा संघर्ष ,वारंवार स्थलांतर आणि विस्थापन ,तरीही जगण्याचा दुर्दम्य अशावाद आणि दारिद्र्याचे दशावतार अशा विदारक सामाजिक प्रश्नांवर एका ऊसतोड कामगाराची ह्रदय पिळवटून टाकणारी अत्यंत करुणामय कहाणी वाचताना अंत:करण द्रवित होते; सोसलेपणाची कणव वाचकांना कादंबरीत गुंतवून टाकते.वाचक अंतर्मुख आणि दिङमूढ होऊन जातो,हेच या कादंबरीचे यश आहे.”

प्रतिभावंत साहित्यिक आणि पूर्वशिक्षणाधिकारी ‘काजवा’कार पोपट काळे यांनी कादंबरीची केलेली पाठराखण आणि डाॅ. लता पाडेकर यांच्या दर्जेदार प्रस्तावनेमुळे या कादंबरीचे साहित्यमूल्य अधिक वृद्धिंगत झाले आहे असे मत डाॅ.ज्ञानेश्वर खैरनार यांनी व्यक्त करून अधिकाधिक नवसाहित्यिकांनी आपल्यातील प्रतिभेला शब्दबद्ध करून आपले लेखन साहित्यजगतात प्रकाशित करावे असे आवाहन प्रास्ताविकातून व्यक्त केले.

यावेळी चि.आराध्य परशुराम नागरगोजे या चिमुकल्याने केलेले ऊसतोड कामगारांच्या व्यथा मांडणारे भाषण सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला,तर ‘काजवा’कार पोपट काळे , प्रा.मधुकर राळेभात आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ(L.I.C.)चे जामखेडचे शाखाधिकारी गणेश औटी यांनी नागरगोजे यांच्या संपूर्ण परिवाराच्या साहित्यिक वाटचालीचे व प्रगतीचे कौतुक करत करत प्रकाशन समारंभास शुभेच्छा दिल्या.

लेखकीय मनोगतातून परशुराम नागरगोजे यांनी ‘पाचाट’ची निर्मितीप्रक्रीया सांगून प्रेरणा मिळालेल्या व सहकार्य लाभलेल्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करत वाचक रसिक मायबापांनी या साहित्यकृतीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन केले. डाॅ.लता पाडेकर यांनी सविस्तरपणे ‘पाचाट’च्या अंतरंगाबद्दल समीक्षात्मक भाष्य करत ‘काळजाचा ठाव घेणारी अस्सल ग्रामीण मराठी साहित्यकृती’ असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सारंग संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुस्वर आवाजात स्वागतगीत सादर केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अलका सपकाळ यांनी तर आभार प्रदर्शन ‘गवसणी’कार मनोहर इनामदार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here