

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; खाजगी बस 200 फुट दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू
खोपोली : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळली. ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होती. या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये 40 ते 45 लोक असल्याची माहिती आहे.

घटनास्थळी मदतकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम आहे. खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. खाजगी बसमध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्यातील कार्यक्रम संपवून हे सर्वजण परत जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले
बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या खासगी बसमध्ये 40 प्रवासी होते. 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 25 प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांना दरीत कोसळेल्या बसमधून बाहेर काढण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. उर्वरित प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. पहाटे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्रीच पुण्याहून ही बस मुंबईला निघाली होती.








