लग्न होत नसलेले मराठवाड्यातील हजारो तरूण “मुंडे रुग्णालया’ला जबाबदार ठरवतात!

बीड : मुलगी घरची लक्ष्मी समजली जाते. मात्र मुलगा हाच वंशाचा दिवा समजून अनेकांनी काही वर्षांपूर्वी मुलींना पोटातच मारण्याचा घाट घातला. 2012 च्या पूर्वी काही वर्षांपासून राज्यात अवैध गर्भलिंगनिदान झाले आणि त्यातून काही डाॅक्टरांच्या घाणेरड्या मानसिकतेमुळे अनेक निष्पाप स्त्री भ्रुणांना गर्भातच मारून टाकण्यात आले. मराठवाड्यामध्ये मुंडे दाम्पत्य या कामगिरीत अव्वल होते. त्याचे दुष्परिणामही त्यांना भोगावे लागत आहे. 2012 मध्ये अवैध गर्भपातादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आणि त्या प्रकरणी मुंडे दाम्पत्य डाॅ. सुदाम व सरस्वती मुंडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत विविध गुन्ह्यांच्या आधारे 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

दरम्यान, मुंडे दाम्पत्याने त्यावेळी हजारो स्त्रीभ्रुण हत्या केल्याचे सांगितले जाते. आजही प्रामुख्याने परभणी आणि बीड जिल्ह्यातील अनेक अविवाहित तरूण आणि त्यांचे वडील लग्नाला मुलगी मिळत नसल्याने संतापाने मुंडे दाम्पत्याला जबाबदार ठरवतात आणि मनातील संतापाची भावना व्यक्त करतात. तसेच डाॅक्टरांसह जे आई वडिलांनी मुलींचा गर्भपात केला ते देखील जबाबदार असल्याचे ते सांगतात.

मुंडे हाॅस्पिटलप्रमाणेच राज्यात इतरही ठिकाणी त्यावेळी मोठ्या प्रमाणात अवैध गर्भलिंगनिदान आणि स्त्रीभ्रुण हत्या होत होत्या. परिणामी आज राज्यातील विविध भागात लाखो तरूण विवाहापासून वंचित राहिले आहेत. लग्न करण्याची इच्छा असतानाही तरूणांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही.

एका सर्वेनुसार मराठवाड्यात बहुतांश गावात 25 मुली लग्नाच्या वयाच्या असतील तर 100 तरूण लग्नाच्या वयाचे आहेत. परिणामी मुलींची संख्या कमी असल्याने आहे त्या मुलींची मुलांकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यातच शेतकरी वर्गातील तरूणांना लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. मराठवाड्यातील हजारो तरूण आणि त्यांचे वडील या परिस्थितीला मुंडे रुग्णालयाला जबाबदार ठरवतात. परळीमध्ये मुंडे हाॅस्पिटल होते. या ठिकाणी ते अवैध गर्भपात करत आणि त्या भ्रुणांची विहिरीत विल्हेवाट लावत असल्याचेही तपासात समोर आले होते.

चालु काळात मुलींची संख्या वाढतेय

सध्या लग्नाच्या वयातील मुलींची संख्या कमी असल्याने तरूणांना विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. मात्र गेल्या काही वर्षांत स्त्री भ्रुण हत्येबाबत जनजागृती वाढली असून स्त्री भ्रुण हत्या जवळपास बंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजुनही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध गर्भलिंगनिदान सुरु असले तरी ते प्रमाण अत्यल्प आहे. सध्या मुलींची संख्या वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या 10 वर्षांच्या पुढील काळात मुलींचे प्रमाण मुलांच्या बरोबरीचे होऊन लग्नासाठी मुलगी मिळणे सोपे होणार असल्याचे एका अहवालात म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here