वारकरी संप्रदायासाठी संत म्हणजेच धर्म – महंत विठ्ठल महाराज

संत वामनभाऊ महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथीनिमित्त सुरू आसलेल्या अखंड हरिनाम सप्ताहची उत्साहात सांगता

जामखेड (प्रतिनिधी) “संतांनी धर्माचे कार्य केले. संतांनीच धर्माचे रक्षण करायला शिकवले. धर्म काय असतो हेही संतांनी शिकवले. त्यामुळे वारकरी संप्रदायासाठी संत म्हणजेच धर्म अशी सोपी व्याख्या करता येईल” असे मत श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री विठ्ठल महाराज यांनी मांडले.

जमादारवाडी, जामखेड येथे संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेत संत वामनभाऊ महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने या उत्सवाची सांगता झाली. त्यावेळी त्यांनी आपले विचार मांडले.

दुडीवरी दुडी गौळणी सातें निघाली ।
गौळणी गोरस म्हणों विसरली ॥

संत एकनाथ महाराज यांच्या अभंगावर चिंतन मांडताना श्री विठ्ठल महाराज पुढे म्हणाले. “संत वामनभाऊ महाराज यांचे पुण्यतिथीनिमित्त देशातच नव्हे तर परदेशातही उत्सव साजरे होतात या उत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती, आपला धर्म, कुळधर्म, कुळाचार यांची जपवणूक करण्याचे काम केले पाहिजे. आपल्या संस्कृतीवर दुसऱ्या संस्कृतीचे अतिक्रमण होत आहे. ते आपण रोखले पाहिजे. संतांनी धर्माचे पालन करून नाम महिमा वाढविला. आज हिंदू धर्मावर अनेक संकटे आहेत. हिंदू धर्म नष्ट करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. साधुसंतांनी सर्वांसाठी वारकरी संप्रदायाचे द्वार खुले केले. या संप्रदायांमध्ये सर्व जातीचे संत होऊन गेले. ज्ञान प्राप्ती करून घ्यायची असेल तर तो ज्ञानी असला पाहिजे तो कोणत्या जातीचा आहे हा भेदभाव सांप्रदायात केला जात नाही. ज्याप्रमाणे मधमाशी कोणत्याही प्रकारच्या फुलावर बसली तर त्यातून केवळ मकरंदच शोषून घेते. त्याप्रमाणे कोणत्याही ज्ञानी व्यक्तीकडून फक्त ज्ञान प्राप्तीची भावना ठेवली पाहिजे. मग तो कोणत्याही जातीचा असो.”
काल्याचे प्रसंग सांगताना महाराजांनी भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीलांचे सुंदर वर्णन केले.

दि.१५जानेवारीला श्रीक्षेत्र
गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ महाराज यांची पुण्यतिथी साजरी झाल्यानंतर जमादारवाडी ,जामखेड येथे सायंकाळी या अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ झाला.श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती ह.भ.प. विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने रविवारी या उत्सवाची सांगता झाली.

हा उत्सव यशस्वी करण्यासाठी कैलास नेटके, बाळासाहेब आजबे, विजय गदादे,अनिल नेटके, आण्णासाहेब नेटके,पांडूरंग कदम, किरण आजबे, दिपक नेटके, सुनील कदम,अर्जुन नेटके, कचरू नेटके, शरद आजबे, उद्धव आजबे, अशोक वीर, संतोष बारगजे, संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे दादासाहेब महाराज सातपुते, बाळकृष्ण महाराज राऊत , निलेश डोकडे, किशोर डोके, दत्ता खवळे, जमादारवाडीचे सर्व ग्रामस्थ , जामखेड शहर व पंचक्रोशीतील भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here