शुभांगी पाटील आशीर्वाद घेण्यासाठी बाळासाहेब थोरातांच्या दारी, पण घरात प्रवेश नाकारल्याने आल्या पावली परतल्या !

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शुभांगी पाटील यांना पाठींबा देण्यात आला आहे. त्यामुळे शुभांगी पाटील आज संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. मात्र, थोरात कुटुंबीय सध्या मुंबईत असल्याने त्यांना प्रवेशद्वारातूनच परत जावे लागले. बंगल्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना घरात प्रवेश नाकारला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचवल्या.

बंगल्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखले नसेल आणि थोरात कुटुंबीय मुंबईत असल्याने पाटील यांना तसे सांगून परत पाठविले, असेल असे स्पष्टीकरण थोरात यांच्या कार्यालयातून देण्यात आले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सत्यजीत तांबे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहे. डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत यांनी पक्षशिस्तीचा भंग केला म्हणून पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. तर दुसरीकडे शुभांगी पाटील यांना शिवसेनेने पुरस्कृत केले असून त्याच महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे. या सर्व प्रक्रियेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला .

थोरात नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला गेले असता ते घसरून पडल्याने त्यांचा खांदा दुखवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहे. त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याने त्यानंतर त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलेला आहे, असे सांगण्यात आले.

दरम्यान आज संगमनेरमध्ये त्यांच्या निवासस्थानी शुभांगी पाटील यांना प्रवेश नाकारण्याचा किस्सा घडला. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह पाटील मोटारीतून थोरात यांच्या निवासस्थानी आल्या. तेव्हा मुख्य प्रवेशद्वार बंद होते. त्यांनी फटीतून आतील कर्मचाऱ्याशी संवाद साधला. आपला परिचय करून दिला. थोरात किंवा त्यांच्या कुटुंबीयांना भेटायचे असल्याचे सांगितले. मात्र, आतील कर्मचाऱ्याने घरी कोणीच नसून सर्वजण मुंबईला गेल्याचे सांगितले. त्यानंतर पाटील यांनी कोणाला तरी फोन केला. पलीकडूनही घरी कोणीच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाटील आल्या पावली परत गेल्याचे पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here