

सिन्नर – शिर्डी महामार्गावर साईभक्तांच्या बसला भीषण अपघात, 10 जण ठार तर 12 गंभीर
नाशिक: सिन्नर-शिर्डी महामार्गावर पहाटेच्या सुमारास मोठा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 साईभक्तांचा मृत्यू झाला. तर 12 जण गंभीर जखमी झालेत. पाथरे गावाजवळच्या हॉटेल वनराईजवळ ही दुर्घटना घडली. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अंबरनाथ, ठाणे परिसरातील 50 प्रवासी या बसमधून शिर्डीचा प्रवास करत होते. मात्र रस्त्यातच 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. एका व्यक्तीचा चेहरा आणि धड वेगळे झाल्यानं त्याची ओळख पटलेली नाही. इतर जखमींना पुढील उपचारासाठी सिन्नर, नाशिकमध्ये हलवण्यात आले आहे. भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्यापैकी सात महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

हा अपघात इतका भीषण होता की बसचा चेंदामेंदा झाला आहे. पहाटेच्यावेळी बसमधील प्रवासी झोपेत होते. अपघात झाला त्यावेळी मोठा आरडाओरडा ऐकू आल्याचे येथे उपस्थित असल्याने सांगितले. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही बस मुंबईहून येत होती. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानंतर अपघात झाला. या अपघातात 5 ते 6 जणांना मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, हाती आलेल्या माहितीनुसार 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

ठाण्यामधून काही साईभक्त बाबांच्या दर्शनासाठी निघाले होते पण नाशिकच्या सिन्नर मध्येच त्यांच्यावर काळाने घात केला. अपघाताची माहिती मिळताच गावकर्यांनी धावाधाव केली. काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तातडीने पोलिस आणि अॅम्ब्युलंस घटनास्थळी आली आणि त्यांनी जखमींना मदत देण्यास सुरूवात केली. बसचा या अपघातामध्ये पार चक्काचूर झाल्याने जखमींची स्थिती गंभीर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.






