बार्शी तालुक्यातील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

बार्शी (प्रतिनिधी) नाशिकच्या जिंदाल पॉली फिल्म कंपनीच्या स्फोटानंतर लागलेली आग धगधगत असतानाच आता सोलापूर जिल्ह्य़ातील स्फोट होण्याची घटना घडली आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात एका फटक्याच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे.

कारखान्यात फटाके बनवत असतांना हा स्फोट झाल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. या स्फोटानंतर आग भडकली. या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून काहीजण जखमी झाले आहेत.

सोलापूरच्या बार्शी तालीक्यातील पांगरी या ठिकाणी हा फटाक्याचा कारखाना आहे. शिरोळा फायरवर्क्स नावाच्या कारखान्यात हा स्फोट झाला आहे. या कारखान्यात फटाके बनवण्याचे काम सुरु असतानाच हा स्फोट झाला आहे. या वेळी कारखान्यामध्ये ४० कर्मचारी काम करत होते असे सांगण्यात येत आहे. या स्फोटात ६ ते ७ जण गंभीर जखमी झाल्याचा अंदाज स्थानिक लोकांनी व्यक्त केला आहे.

या स्फोटानंतर परिसरात खळबळ माजली. स्फोट झाल्यानंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोटानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहे.

या कारखान्यामध्ये पांगरी जवळ असलेल्या बांगरवाडी, वालवाड, उकडगाव या भागातील लोक काम करतात. या स्फोटानंतर स्थानिक लोक तसेच अग्निशमन दल यांच्या प्रयत्नामुळे आग लवकर नियंत्रणात आणण्यास मदत झाली. हि आग नेमकी कशी लागली हे समंजू शकलेलं नाही. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here