

क्रिकेटर रिषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात, अपघातानंतर BMW कारने पेट घेतला!
दिल्ली : स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत जखमी झाला आहे. ऋषभवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीहून परतताना हम्मदपूरजवळ अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात
दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहेत. ऋषभला डेहराडूनमधील रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ऋषभ पंतवर तातडीने प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल, अशी माहिती आहे.

गाडी चालवताना झोप लागल्याने अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत स्वत: गाडी चालवत होता. गाडी चालवताना झोप आल्याने हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. ऋषभ पंत गाडीत एकटाच होता. अपघात झाल्यानंतर गाडीला आग लागली. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. ऋषभ पंतला डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ऋषभची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. ऋषभ दिल्लीहून उत्तराखंडमध्ये आपल्या रुडकी येथील घरी येत होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली.






