चोरट्यानी कारमधून छायाचित्रकाराचा ड्रोन कॅमेरा लांबविला

कड्यात भरदुपारी मंगल कार्यालयात घडलेला प्रकार

कडा (प्रतिनिधी) मंगल कार्यालयात लग्नाच्या कार्यक्रमाला फोटो व व्हिडीओ शुटींग करण्यासाठी गेलेल्या छाया चित्रकाराच्या कारमधून सत्तर हजाराचा ड्रोन कॅमेरा व इतर साहित्य अज्ञात चोरट्यानी भरदुपारी लांबविला असल्याची खळबळजनक घटना कडा परिसरात घडली असून, याप्रकरणी छायाचित्रकार सागर चंद्रशेखर ढोले यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कडा येथील छायाचित्रकार सागर चंद्रशेखर ढोले यांचा फोटोग्राफीचा व्यावसाय आहे. काही दिवसांपूर्वी दि. १७ डिसेंबरला कडा परिसरातील महेश मंगल कार्यालयात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान तालुक्यातील एकसिंगे व कराळे यांचा शुभविवाह सोहळा होता. त्या कार्यक्रमाचे चित्रीकरणाचे काम सागर ढोले यांच्याकडे होते.

त्या दिवशी दुपारी लग्नाची ड्रोनव्दारे शुटींग करण्यात आले. मात्र दुपारनंतर ड्रोन कॅमे-याचे शुटींग पुर्ण झाल्यानंतर ढोले यांनी मंगल कार्यालयाच्या परिसरात उभ्या केलेल्या स्वत:च्या कारच्या बॅगमध्ये ड्रोन कॅमेरा, रिमोट व कॅमे-याची बॅटरी आणून ठेवली. कार लाॅक करुन पुन्हा लग्नाचे पुढील कार्यक्रमाचे फोटो काढण्यासाठी ते पुन्हा मंगल कार्यालयात गेले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता लग्नाचा कार्यक्रम उरकून ढोले त्यांच्या कारकडे आले असता चालकाच्या उजवीकडील बाजूची काच तुटल्याचे आढळून आली. मात्र सीटवर ठेवलेल्या बॅगमधील ड्रोन कॅमेरा, रिमोट व कॅमे-याची बॅटरी गायब केल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर गडबडलेल्या छायाचित्रकाराने पुन्हा मंगल कार्यालयाच्या परिसरात आजूबाजूला कॅमेरा चोरीस गेल्यामुळे चौकशी केली असता माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे सागर ढोले यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द कडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोकाॅ संतोष नाईकवडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here