वाहि-यात १ लाख ३४ हजाराचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त
————–
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धाडसी कारवाई
————–
कडा / वार्ताहर
————–
खब-याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहिरा येथे मंगळवारी सकाळी एका घराच्या बाजूच्या पत्र्याच्या शेडवर अचानक छापा टाकून बेकायदेशीरपणे दारुची चोरटी विक्री करण्यासाठी लपवून ठेवलेला १ लाख ३४, ७८०/- रुपये किंमतीचा देशी-विदेशी दारुचा साठा जप्त करुन शिवाजी बापुराव आटोळे नावाच्या इसमावर महाराट्र दारुबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहिरा येथे एका घराच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दारुची चोरटी विक्री करण्यासाठी विनापरवाना बेकायदेशीरपणे देशी- विदेशी दारूचा साठा लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खब-यामार्फत मिळाली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने मंगळवार दि.२७ रोजी सकाळी सात वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी अवैद्य दारु साठ्यावर अचानक छापा मारला असता त्या पत्र्याच्या शेडमध्ये एक लाख ३४, ७८०/- रुपये किंमतीच्या देशी- विदेशी दारूच्या नऊशेहून अधिक बाटल्यांचा साठा मिळून आला. यामध्ये देशी दारूच्या ४८०, विदेशी दारूच्या ४३०, तर बियरच्या १२ बाटल्या आढळून आल्या आहेत. पोलिसांकडून सदर मुद्देमाल जप्त करुन आरोपी शिवाजी बापूराव आटोळे (रा.वाहिरा ता.आष्टी) नावाच्या इसमावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपनिरिक्षक संजय तुपे, पोहेकाॅ नसीर शेख, कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, सतीष कातखडे, राहूल शिंदे, जायभाय, राजू पठाण, यादव, वाहनचालक गणेश मराडे, संपत तांदळे आदीं कर्मचा-यांनी पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, स्थागुशाचे पोलिस निरिक्षक सतीष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या या धाडसी कारवाईमुळे स्थानिक पोलिसांबद्दल आता उलटसुलट चर्चा होऊ लागली, तर दुसरीकडे मात्र आष्टीत मद्य माफियांमध्ये भलतीच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here