कर्जतमधील तानाजी हॉटेल हल्ला प्रकरणी 6 आरोपींना अटक;  मारहाणीच्या निषेधार्थ कर्जत शहर बंद

कर्जत (प्रतिनिधी) दि.२५ कर्जत शहरातील कुळधरण रस्त्यावर गुंडवस्ती येथे असलेल्या तान्हाजी हॉटेलवर काही लोकांनी जेवण करून जेवणाचे बिल देण्यास नकार देत हॉटेलमधील सामानाची मोडतोड करून हॉटेल चालकांना मारहाण करणाऱ्या सहा आरोपींना हॉटेल चालक पंडित युवराज निंबाळकर (रा.नांदगाव ता. कर्जत)यांच्या फिर्यादीनंतर कर्जत पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, ‘दि.२४ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास हॉटेल तानाजी येथे प्रकाश चंद्रकांत कांबळे (रा. सिद्धार्थनगर, कर्जत) व त्यासोबत अन्य दोघे जेवण करण्यासाठी आले असता त्यांनी जेवणानंतर पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ व दमदाटी करून बिल देण्यास नकार दिला. ‘बिल द्यावे लागेल’ असे म्हणल्यावर त्यांनी मोठ्याने आरडा-ओरडा करून जास्त त्रास देण्यास सुरुवात केली.आरोपी प्रकाश कांबळे याने इतर आरोपींना फोन करून बोलावून घेतले.

त्यानंतर प्रकाश चंद्रकांत कांबळे, सोहम किसन कदम, करण बाळासाहेब थोरात, सागर उर्फ आनंद गौतम समुद्र, रोहन किसन कदम, मनोज विजय माने सर्व (रा. कर्जत) सर्व (रा.कर्जत) व इतर २५ ते ३० लोकांनी ओमीनी व्हॅन व मोटरसायकल वर येऊन काठ्या-गज असे साहित्य घेऊन हॉटेलमध्ये येऊन फिर्यादिस काठीने व गजाने तोंडावर, खांद्यावर,पाठीवर मारहाण करून हात व गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी फिर्यादीचे हॉटेल व्यावसायिक सहकारी महेंद्र लालासाहेब बागल कामगार फारूक शेख हे मध्ये आले असता त्यांनाही सात ते आठ लोकांनी मारहाण केली. हॉटेलमधील फ्रीज, काउंटर, किचन सामान, टीव्ही, टेबल, खुर्च्या, बेसिन,हॉटेल मधील ग्राहकांना बसण्यासाठी असलेल्या पार्टीशन रूमचे नुकसान केले. कर्जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही तसेच फिर्यादी व साक्षीदार यांना विचारपुस करून आरोपी निष्पन्न करून मुख्य आरोपीसह प्रकाश चंद्रकांत कांबळे, सोहन किसन कदम, करण बाळासाहेब थोरात, सागर उर्फ आनंद गौतम समुद्र, रोहन किसन कदम, मनोज विजय माने सर्व (रा. कर्जत) या सहा आरोपींना जेरबंद केले आहे. इतर आरोपींची नावे निष्पन्न करून कायदेशीर कारवाई सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, आनंद सालगुडे, पोलीस जवान श्याम जाधव, गोवर्धन कदम, शाहूराज तिकटे, महादेव कोहक, पांडुरंग भांडवलकर, प्रवीण अंधारे सलीम शेख, सचिन वारे, बळीराम काकडे यांनी केली.

मारहाणीच्या निषेधार्थ कर्जत शहर बंद

या घटनेचे तीव्र पडसाद कर्जत शहरामध्ये उमटले. या घटनेचा निषेध म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने कर्जत शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे कर्जत शहरामध्ये सकाळपासून सर्व व्यवहार पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा कर्जत शहर बेमुदत बंद ठेवू असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला होता. कर्जत शहरातून सकाळी युवकांनी रॅली काढली आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडे मारहाणीच्या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली होती. याची दखल घेत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here