

आष्टी तालुक्यातील शेतात पकडला सात लाखाचा गांजा
स्थानिक गुन्हे शाखेसह अंभोरा पोलिसांची संयुक्त कारवाई
कडा (वार्ताहर) तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बाळेवाडी शिवारात आरोपी हनुमंत अर्जुन पठारे याच्या कापसाच्या शेतात छापा मारुन बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेसह अंभोरा पोलिसांनी संयुक्तीक कारवाई करून सात लाख किंमतीचा 70 किलो वजनाचा गांजा पकडला असून आरोपी फरार झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

याबाबत पोलीस सूत्रांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बाळेवाडी शिवारात कापसाच्या शेतात गांजाची झाडे लावली असल्याची गोपनीय माहिती खब-याकडून पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शुक्रवार दि.९ रोजी दुपारच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा बीडच्या पथकासह अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी संयुक्तिक छापा मारून आरोपी हनुमंत अर्जुन पठारे नावाच्या इसमाच्या शेतातील कापसाच्या झाडांमध्ये अंदाजे सात लाख रुपये किंमतीची सत्तर किलो वजनाची गांजाची झाडे मिळून आली.

बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय ज्ञानेश्वर कुकलारे, अंभो-याचे एपीआय रोहित बेंबरे, पीएसआय भगतसिंग दुल्लत, पीएसआय रवी देशमाने, पोकॉ प्रसाद कदम, रामदास तांदळे, वचिष्ठ कांगणे, सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, अतुल हराळ, अशोक कदम, शिवदास केदार, बाबुराव तांदळे, इत्यादी पोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी घटनास्थळी संयुक्त कारवाई केली. या प्रकरणातील आरोपी हनुमंत पठारे हा फरार झाला असल्याची माहिती स्थागुशा पोलिसांकडून देण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास पीएसआय आदीनाथ भडके करीत आहेत.







