

जामखेड येथे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध
जामखेड (प्रतिनिधी) कॉंग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले असून त्याबद्दल त्यांचा जामखेड येथिल भाजपा तालुका युवा मोर्चाच्या वतीने शहरातील खर्डा चौकात जोडे मारुन आंदोलन करुन निषेध व्यक्त करण्यात आला.


या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या तिव्र भावना व्यक्त करताना सांगितले की, सावरकर हे इंग्रजाचे नोकर होते, असे संबोधून राहुल गांधी यांनी सावरकरांचाच नव्हे तर संपूर्ण भारतीयांचा आणि स्वातंत्र्य काळात ज्या देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशा वीरांचा अपमान केला आहे. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढत असताना अंदमानचा कारावास भोगला, स्वतःचे संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले, त्यांच्याबाबत उच्चारलेले अपशब्द आम्ही कदापी सहन करणार नाही.

तसेच महाराष्ट्राची व देशाची जनता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कधीच सहन करणार नाही. राहुल गांधी यांनी वापरलेले अपशब्द, त्यांनी ताबडतोब मागे घेऊन महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी आंदोलन कर्त्यांनी बोलना दिला आहे.

युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, तालुका उपाध्यक्ष मोहन (मामा) गडदे ज्ञानेश्वर अंदुरे, जिल्हा चिटणीस उदय पवार, गोरक घनवट, शिवकुमार डोंगरे, शिवकुमार गुगळे, डॉ. महेश मासाळ, अजय सातव, अर्जुन म्हेत्रे, मोहन देवकाते, ऋषिकेश मोरे, पांडूरंग मोरे, लक्ष्मण वाघमोडे, मनोज गडदे, बारीकराव हुलगुंडे, तुषार बोथरा, आण्णा ढवळे, जयदिप मडके, सावता जाधव, वैभव कार्ले, प्रवीण कार्ले, अंगद कार्ले, नितीन धनवटे, संजय वाघमोडे, चंदू कार्लेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.






