

भयंकर! मृतदेहाचे 32 तुकडे केले, 18 दिवस फ्रिजमध्ये ठेवले; वसईतील तरुणीची दिल्लीत निर्घृण हत्या.
क्राईम रीपोर्ट……..
मंबई : वसईतील माणिकपूर मधील 27 वर्षीय तरुणीची दिल्लीत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. श्रद्धा असे मृत तरुणीचे नाव असून आफताब अमीन पूनावाला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

लिव्ह इन रिलेशनमधून हे हत्याकांड झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि आफताब हे दोघे मुंबईतील एका मल्टिनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होते. येथे दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी आपल्या प्रेमाची माहिती घरच्यांना दिली. मात्र घरच्यांनी विरोध केल्याने दोघेही दिल्लीला पळून गेले आणि लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. दिल्लीमध्ये छतरपूर भागात दोघे एकत्र रहात होते. श्रद्धाचे कुटुंबीय सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची विचारपूस करत होते. मात्र श्रद्धा लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत असल्याने आफताबने तिचा खून केला.

अनेक दिवस झाले तरी मुलीशी संपर्क न झाल्याने आणि सोशल मीडियावर तिने एकही पोस्ट न टाकल्याने श्रद्धाच्या आई-वडिलांनी संशय आला. श्रद्धाचे वडील विकास मदन वॉकर यांनी तडक दिल्ली गाठली. आफताब आणि श्रद्धा रहात असलेल्या फ्लॅटवरही ते गेले. मात्र तिथे कुलूप असल्याचे पाहून त्यांनी मेहरौली पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलिसांनीही अपहरणाचा गुन्हा समजून तपास सुरू केला. मात्र आफताबला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले.

लिव्ह-इनमध्ये असताना श्रद्धा लग्नासाठी दबाव टाकत असे. यावरून आमच्यात भांडणे होत होती. 18 मे रोजीही लग्नावरून आमच्यात कडाक्याचे भांडण झाले. सततच्या कटकटीने कंटाळल्याने आपण श्रद्धाचा गळा आवळून खून केला आणि तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. यानंतर हे तुकटे फ्रिजमध्ये ठेवले आणि नंतर दिल्लीतील अनेक भागात हे तुकडे फेकले, अशी माहिती आफताबने पोलीस चौकशीत दिली.

श्रद्धाच्या खुनाचा पत्ता लागू नये म्हणून आफताबने अत्यंत थंड डोक्याने विचार करत तिच्या मृतदेहाचे 32 तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. यासाठी त्याने 300 लीटरचा नवीन फ्रिजही खरेदी केली. यानंतर रोज दुपारी दोन वाजता फ्लॅटमधून बाहेर निघायचा आणि मृतदेहाचा एक-एक तुकडा फेकून येत होता. 16 दिवस त्याचा हा सिलसिला सुरूच होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.






