

स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अशा शिबिराचा फायदा पुढे विद्यार्थ्यांना होतो- गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे
दत्तवाडी शाळेत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न
जामखेड प्रतिनिधी
उपक्रमशील शाळा व ध्येयवादी शिक्षक ही शिक्षण विभागाची खरी मालमत्ता असते. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी भविष्यात अशा स्कॉलरश व नवोदय सारख्या शिबीरांचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. आसे मत जामखेड चे गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

जिल्हा परिषद अहमदनगरच्या ‘मिशन आपुलकी ‘ या उपक्रमांतर्गत तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी येथे लोकसहभागातून सात दिवसीय नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन शिबीर नुकतेच संपन्न झाले.संपूर्णत: मोफत व अनिवासी स्वरूपाचे असलेल्या या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी मा.श्री.कैलास खैरे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की ‘मिशन आपुलकी’ हा जिल्हा परिषद अहमदनगरचा राज्याला दिशादर्शक असा स्तुत्य उपक्रम असून या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून शाळेला भौतिक सुविधांची पूर्तता व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते. विकसनशील दृष्टीकोन असलेले तालुक्याचे गटविकास अधिकारी मा.श्री.प्रकाश पोळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात एक शैक्षणिक चळवळ उभी राहिली असून दत्तवाडी शाळेने लोकसहभागातून दिवाळीच्या सुट्टीत आयोजित केलेले शिबीर हा त्याचाच एक भाग आहे.

तालुक्यातील दत्तवाडी, लटकेवस्ती, बसरवाडी, पिंपरखेड यांसारख्या उपक्रमशील शाळा व ध्येयवादी शिक्षक ही शिक्षण विभागाची खरी मालमत्ता आहे. दत्तवाडी शाळेत म.गांधींच्या थ्री एच्.विकसन प्रणालीनुसार (हेड,हर्ट &हँड) विद्यार्थ्यांचा बौद्धिक,भावनिक व शारिरीक असा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पूरक अशा नाविन्यपूर्ण सहशालेय उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी केली जाते असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

दि.१नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या शिबिराचा समारोप सोमवार दि.७नोव्हेंबर २०२२ रोजी झाला.मा.श्री.प्रविण शिंदे (मळईवस्ती) मा.श्री.रविंद्र भोसले (खांडवी)या नवोदय विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या प्रकट मुलाखतीने शिबिराचा प्रारंभ झाला.शिबीरकाळात ‘यशोदीप’ प्रकाशनाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांवर आधारित अनेक दर्जेदार पुस्तकांची निर्मिती केलेल्या प्रसिद्ध लेखिका मा.सौ.मंगल आहेर गावडे (पुणे), कायझेन अॅकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अहमदनगरचे मा.श्री.महेश डाळींबकर, मा.श्री. माधव घाडगे(बीड) ,मा.श्री.सुदाम शिंदे (जवळा),मा.श्री.बाळासाहेब जरांडे (पवारवस्ती),मा.श्री.विक्रम डोळे (मुंगेवाडी),’गोष्ट विश्वविक्रमाची’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका मा.सौ.ज्योती नागरगोजे (जामखेड), जि.प.अहमदनगरचा सन २०२२ चा जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त मा.श्रीम.अनिता पवार पिंपरे (लटकेवस्ती),मा.श्री.भगवान साळुंके (पिंपरखेड), मा.श्री.केशव हराळे (पाडळी), ‘लक्ष्य नवोदय ‘ या पुस्तकाचे लेखक मा.श्री.रफी शेख(जालना) यांनी शिबिरात सहभागी झालेल्या २२ शाळांतील ९० विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या दृष्टीने भाषा, गणित व मानसिक क्षमता चाचणी या विषयांवर घटकनिहाय मार्गदर्शन केले.

नान्नज व खर्डा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश कुंभार, ‘सेवाश्रय’ फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ बालके, विधवा महिला व गरजू कुटुंबे यांच्या कल्याणासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणारे पाथर्डी येथील सौ.अनुराधा व श्री.पोपट फुंदे हे शिक्षक दांपत्य ,विश्वदर्शन न्यूज वाहिनीचे संपादक गुलाब जांभळे, नवीन मराठी प्राथ शाळा जामखेडचे विश्वस्त उमेश देशमुख, तालुक्याच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर तसेच विविध दैनिकांचे पत्रकार बांधव यांनी शिबिरास सदीच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

समारोप सोहळ्यात दत्तवाडी शाळेतील अवधुत लोहार या विद्यार्थ्याच्या ‘बोलावा विठ्ठल ‘या संत तुकारामांच्या अभंग गायनाने व संगीत क्षेत्रातील एक जाणकार व आदरणीय व्यक्तिमत्व असलेले मा.श्री.विक्रम बडे (घोडेगाव) यांनी गायलेल्या ‘छोटेसे बहीण भाऊ ‘ या बालगीताने उपस्थितांची मने जिंकली. विविध शाळांतील शिबिरार्थी विद्यार्थीनींच्या गीतमंचाने सुस्वर आवाजात स्वागतगीत सादर केले.यावेळी सक्षम सानप व सार्थक ओमासे (पिंपरखेड), जिया भामुद्रे (पवारवस्ती), अर्पिता हजारे (दत्तवाडी), जयेश कचरे (घोडेगाव), लक्ष्मी लटके (लटकेवस्ती),आर्या दहीकर (पाडळी) व अक्षरा शिंदे (जवळा) यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तर पत्रकार अविनाश बोधले व सीमा सानप यांनी पालक प्रतिनिधी म्हणून आपले शिबिरातील अनुभव कथन केले व शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती , पालक शिक्षक संघ व माता पालक संघ दत्तवाडी तथा धोंडपारगाव ग्रामस्थांचे आभार मानले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री.विजय जेधे (काकडेवस्ती ) यांनी प्रभावीपणे व ओघवत्या शैलीत केले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री.सुशिलकुमार धुमाळ, उपाध्यक्ष मा.श्री.मारूती सराफ यांच्यासह मा.श्री.श्रीराम कुमटकर, मा.सौ.कमलताई सुभाष पवार, मा.श्री. बाळासाहेब येवले, मा.श्री.तुषार जेधे, मा.श्री.दत्तात्रय धुमाळ,मा.श्रीम.पार्वती इनामदार, मा.श्री.विकास सोनवणे, मा.श्री.बळीराम शिंदे, मा.श्री.ज्ञानेश्वर क्षीरसागर, मा.श्री. परशुराम नागरगोजे, मा.श्रीम.राधाबाई तुपविहिरे , मा.श्रीम.अरूणाताई औटे या मान्यवरांनी शिबिरार्थींना शिबीर काळात गरमागरम व स्वादिष्ट अशी अल्पोपहार व्यवस्था केली,तर पिंपरखेड व घोडेगाव येथील शिबिरार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आर्थिक स्वरूपात सहकार्य केले. समारोप सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्वांसाठी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करणारे व दत्तवाडी शाळेत बीड जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने नुकतेच हजर झालेले आदर्श शिक्षक मा.श्री.हरिदास पावणे यांचा तर प्रतिनियुक्तीवर दत्तवाडी शाळेत अत्युत्कृष्ट काम केल्याबद्दल खुंटेवाडी शाळेचे उपाध्यापक मा.श्री.योगेश तुपविहीरे यांचा मान्यवरांचे हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
ज्यांच्या संकल्पनेतून व अथक परिश्रमातून हे शिबीर संपन्न झाले असे दत्तवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर इनामदार यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या आयोजनाचा उद्देश, स्वरूप व आवश्यकता स्पष्ट करून सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक व शिक्षणप्रेमी दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वीपणे संपन्न झाल्याबद्दल कृतज्ञता व कृतार्थता व्यक्त केली, तर शाळा व्यवस्थापन समिती दत्तवाडीचे सदस्य तथा श्री.नागेश विद्यालयाचे अध्यापक मा. श्री.संतोष पवार यांनी आभारप्रदर्शन केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी नान्नज केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.बाबासाहेब कुमटकर, सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ मंडळ धोंडपारगाव तसेच तालुक्यातील अनेक शिक्षक बांधव यांचे विशेष योगदान लाभले.






