दत्तवाडी शाळेत लोकसहभागातून मोफत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन शिबिरास सुरुवात

तालुक्यातील विविध शाळांतील 90 विद्यार्थी घेत आहेत शिबिराचा लाभ

जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी येथे मंगळवार दि.1 नोव्हेंबर 2022 रोजी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन शिबिरास उत्साहात प्रारंभ झाला. नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रविण शिंदे सर व रविंद्र दत्तात्रय भोसले यांनी शिबिराचे उद्घाटन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती दत्तवाडीचे अध्यक्ष सुशिलकुमार धुमाळ हे होते. शिबिराचे स्वरूप व उद्देश प्रास्ताविकातून शाळेचे मुख्याध्यापक मनोहर इनामदार सर यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थ मंडळ धोंडपारगाव, तालुक्यातील अनेक शिक्षक बांधव तसेच विविध शिक्षणप्रेमी दानशूर नागरिक यांच्या सहकार्याने लोकसहभागातून हे शिबीर रोज सकाळी 10 ते सायं.5 या वेळेत संपन्न होणार असून ते अनिवासी व पूर्णतः मोफत स्वरूपाचे आहे.

नवोदय, शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध, सैनिक स्कूल प्रवेश इ. महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा संदर्भात आपल्या सेवाकालात बहुमोल योगदान दिलेल्या अहमदनगरसह बीड,जालना,पुणे इ.जिल्ह्यांतील विविध नामांकित तज्ज्ञांचे या शिबिरात मार्गदर्शन लाभणार आहे.


जि.प.प्रा.शाळा मळईवस्ती (अरणगाव) येथील उपक्रमशील शिक्षक प्रविण शिंदे सर व सध्या पुणे येथील शासकीय बी.जे.मेडिकल काॅलेज येथे MBBS च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेले रविंद्र दत्तात्रय भोसले या नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या प्रकट मुलाखतीने उद्घाटनसत्र अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले. विशेष योगायोग असा की रविंद्र भोसले यांना इ.5 वीच्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शक शिक्षक म्हणून प्रविण शिंदे सर होते. शिक्षक आणि विद्यार्थी यांचा अनेक वर्षानंतर एकाच वेळी एकाच व्यासपीठावर झालेल्या उद्घाटक व प्रकट मुलाखतीसारख्या आगळ्यावेगळ्या सन्मानाने आणि जुळवून आलेल्या विलक्षण योगाने दोघांच्याही भावना अनावर झाल्या. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विचारलेल्या विविधांगी प्रश्नांची त्या दोघांनीही दिलखुलासपणे व हसतखेळत उत्तरे देत नवोदय विद्यालयाची स्थापना, हेतू, कार्यपद्धती, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा पद्धती, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप,अभ्यासाची तयारी कशी करावी याबद्दल अभ्यासपूर्ण सविस्तर माहिती सांगून विद्यालयातील अनेक स्वानुभव कथन करत ‘शिक्षणासाठी या व सेवक बनून समाजात जा’ या ध्येयानुसार नवोदय विद्यालय चालते असे सांगितले.

यावेळी जि.प.प्रा.शाळा पिंपरखेड येथील आदर्श शिक्षक भगवान साळुंखे सर, श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय जवळे येथील अध्यापक सुदाम शिंदे सर आणि जि.प.प्रा.शाळा पवारवस्तीचे मुख्याध्यापक बाळासाहेब जरांडे सर यांनी अनुक्रमे गणिताची पायाभूत तयारी कशी करावी, व्यवहारी व दशांश अपूर्णांकांवरील क्रिया आणि परिमिती, क्षेत्रफळ व घनफळ इ.घटकांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

शिबिरार्थींना अल्पोपहार स्वरूपात जिलेबी, पोहे आणि इडली-चटणी अनुक्रमे श्रीराम आश्रुबा कुमटकर, रामा शिवलिंग लोहार आणि संतोष पवार सर या दत्तवाडी शाळेच्या पालकवृंदांनी केली. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशिलकुमार धुमाळ, उपाध्यक्ष मारूती सराफ, शिक्षणप्रेमी ज्येष्ठ नागरिक गोकुळ बाबुराव ढवळे साहेब, आदर्श शिक्षक केशव हराळे विजय जेधे सर, प्रसिद्ध निवेदक हनुमंत म. निकम, रामचंद्र शिंदे सर यांच्यासह शिबिरार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सहकार्य केले. तालुक्यातील दत्तवाडी सह घोडेगाव, फक्राबाद, बांधखडक, पवार वस्ती, काकडे वस्ती, लटकेवस्ती, पिंपरखेड, नविन मराठी (लोकमान्य) शाळा जामखेड, बावी, वाघा, पाडळी, सारोळा, पिंपळगाव आळवा, जगताप वस्ती, छत्रपती शिवाजी विद्यालय जवळे, नंदादेवी विद्यालय नान्नज, नागेश विद्यालय जामखेड व ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड येथील एकूण 90 विद्यार्थी या शिबिराचा लाभ घेत आहेत.


या शिबिराच्या आयोजनास तालुक्याचे कार्यक्षम गटविकास अधिकारी प्रकाश पोळ साहेब व गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे साहेब यांची प्रेरणा व प्रोत्साहन असून दत्तवाडी शाळेचे मुख्या. श्री.मनोहर इनामदार सर यांच्या संकल्पनेतून संपन्न होत असलेल्या या शिबिराच्या नियोजनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश कुंभार साहेब व राजेंद्र त्र्यंबके साहेब तसेच नान्नजचे केंद्रप्रमुख बाबासाहेब कुमटकर साहेब यांचे कुशल मार्गदर्शन लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here