

तालुक्यातील पिंपरखेड नंतर दोन दिवसातच देवदैठण येथे झाली भरदिवसा घरफोडी
दोन पोलीस स्टेशन असुनही तालुक्यातील भरदिवसा घरफोड्यांचे प्रमाण कमी होईना
जामखेड प्रतिनिधी : 30 ऑक्टोबर
जामखेड तालुक्यात दोन पोलीस स्टेशन असुनही भरदिवसा चोर्या होण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही तालुक्यातील पिंपरखेड या ठीकाणी भरदिवसा घरफोडीचे प्रकरण ताजे असतानाच देवदैठण या ठीकाणी पुन्हा दुसर्या दिवशी भरदिवसा घरफोडी झाली आहे.


दोन दिवसापुर्वीच तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकरी आण्णासाहेब पाडुरंग शिंदे यांच्या घरात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता ही घटना असतानाच तालुक्यातील देवदैठण येथे दिवसा ढवळ्या चोरी होऊन ७३ हजारांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरटा पसार झाला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील देवदैठण येथील जामखेड रोडवरील आजीनाथ गेणदेव भोरे (वय ५०) यांच्या राहते घराचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरटयाने कशाने तरी तोडुन घरामध्ये प्रवेश करून घरामधील कपाटाची व सामानाची उचकापाचक करून कपाटामध्ये ठेवलेले ५० हजारांच्या रूपयांच्या रोख रक्कमेसह २३००० रूपये किंमतीची एक सोन्याची बोरमाळ, कानातील फुले, नथ, व दोन ओम असे अंदाजे 30 ग्राम वजना सोन्याचे दागिने असा एकूण ७३,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा ऐवज भरदिवसा घरफोडी करून चोरून नेला आहे. सदरची घटना काल दि. २९ आॅक्टोबर ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान म्हणजे दिवसा ढवळ्या घडली आहे. घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्टेबल आर.के. सय्यद हे करत आहेत.
या पुर्वी देखील जामखेड तालुक्यात दोन दिवसांपुर्वी पिंपरखेड सह दोन तीन महीन्यापुर्वी पिंपळवाडी, कोल्हेवाडी व कडभनवाडी परीसरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर कोल्हेवाडी मध्ये देखील भरदिवसा घरफोड्या झाल्या होत्या. त्यातच काल पुन्हा दैवदैठण येथे भरदिवसा घरफोडी झाल्याने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांन कडुन होत आहे.







