

जामखेडमधील व्यापाऱ्यांस 50 लाखांची खांडणी मागत केली मारहाण
जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापतीसह आठ जणांविरोधात गुन्हे दाखल
जामखेड प्रतिनिधी
50 लाखाची खांडणी मागील्या प्रकरणी जामखेड शहरातील प्रसिध्द व्यापारी कुटूंबाला सातत्याने धमकावणे व मारहाण केल्याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला आठ जणांविरोधात कलम 387 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापतींचा समावेश आहे. या प्रकरणामुळे राजकिय आणि व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

जामखेड शहरातील प्रसिध्द व्यापारी कुटूंब असलेल्या अंदुरे कुटूंबाचे जामखेड शहरात शितल कलेक्शन, 2) शितल ट्रेडर्स, 3) शितल सुपर मार्केट, 4) मे. रावसाहेब बाबुराव अंदुरे भांड्याचे दुकान शाखा नं. 1 जून्या बस स्टॅण्ड समोर, जामखेड व 5) मे. रावसाहेब बाबुराव अंदुरे भांड्याचे दुकान शाखा नं. 2 जूना कोर्ट रोड, जामखेड अशी पाच दुकाने आहे. या कुटुंबाकडे जामखेड पंचायत समितीचे सदस्य तथा भाजपचे वजनदार नेते डाॅ भगवान मुरुमकर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी 50 लाखांची मागणी केली होती. या पैश्यांच्या मागणीसाठी अंदुरे कुटुंबातील सदस्यांना सातत्याने मारहाण आणि दमबाजी करण्यात आली होती.त्यानुसार आठ जणांविरोधात कलम 387 अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत.


या प्रकरणी फीर्यादी सागर अंदुरे यांनी आपल्या फीर्यादीत म्हंटले आहे की 23 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 8/30 वा चे सुमारास माझे वडील उमाकांत अंदुरे हे आमचे मे. रावसाहेब बाबुराव अंदुरे भांड्याचे दुकान शाखा नं. 1 जून्या बस स्टॅण्ड समोर, जामखेड या दुकानासमोर रोडच्या पलीकडे असलेल्या चहाच्या टपरीवर गेले असता तेथे भरत जगदाळे याने त्यांना बोलावले व वडीलांना म्हणाला की, तुमची दिलेली मुदत आज संपली. पैसे आम्हाला देणार आहात की नाही. त्यावर वडील उमाकांत त्यांना म्हणाले की, आम्ही पैसे देवु शकत नाही, असे म्हणताच भरत जगदाळे यांनी वडीलांना मारहाण करण्यास चालु केले. त्यांचेसोबत सागर डिसले, अमोल आजबे दोघे रा. जामखेड ता. जामखेड हेही वडीलांना मारु लागले व म्हणाले की, सभापतीने सांगुन पण तुम्ही पैसे देत नाहीत काय आता खल्लासच करतो असे ते बोलत मारहाण करु लागले.


त्यांनी वडीलांच्या डोक्यात हातात दगड मारून मारहाण केली व त्यांना खाली पाडले व त्यांना लाथा मारु लागले नंतर तिघांनीही त्यांचे हातात मोठी फरशी घेवून त्यांच्या छातीवर मारली. हे बघून माझे चुलते शशिकांत तेथे धावुन गेले व भांडणे सोडवीत असताना वरील तिघांनी त्यांच्या पण डोक्यात हातात वीट धरून मारहाण केली व त्यांनाही खाली पाडले. त्यानंतर मी तेथे जाऊन भांडण सोडवायचा प्रयत्न केला असता त्या तिघांनी मला पण लाथाबुक्क्याने व दगडाने मारहाण केली व बोलले की, भगवान मुरुमकरने मागीतलेले पैसे देत नाही का आता खल्लासच करतो. असे म्हणून धमकी दिली.

व ते आम्हाला म्हणाले की, तुम्ही जर पोलीस कंम्प्लेंट केली तर आम्ही तुमचे दुकान फोडुन टाकु व दुकानातील सेल्समन यांना मारहाण करु असे म्हणून ते तेथून निघून गेले.भरत जगदाळे, सागर डिसले, अमोल आजबे सर्व रा. जामखेड ता. जामखेड यांनी केलेल्या मारहाणीत माझे वडील उमाकांत अंदुरे व चुलते शशिकांत अंदूरे यांच्या डोक्याला दुखापत होवून ते जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या छातीत व अंगावर मारहाण झाल्याने आम्ही पोलिस स्टेशनला येवून दवाखाना मेमो घेवून त्यांना पुढील उपचार कामी नगर येथील हॉस्पीटल मध्ये दाखल केले आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान सागर अंदुरे यांच्या फिर्यादीवरून पंचायत समिती सदस्य डाॅ भगवान मुरुमकर रा. साकत ता. जामखेड, भरत जगदाळे रा. जामखेड, विक्रम डाडर रा. जामखेड, सोनु वाघमारे रा. जामखेड, सागर डिसले रा. जामखेड, अमोल आजबे रा. जामखेड व इतर दोन इसम नाव अश्या आठ जणांविरोधात कलम 387 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.







