

उद्या पासून ‘हर हर महादेव’ चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नडमध्ये होणार प्रदर्शित
पाच भारतीय भाषांमध्ये घुमणार शिवगर्जना, जामखेड च्या गोरोबा सिनेमागृहात देखील येणार चित्रपट
मंबई : केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि जगात कुठेही असणाऱ्या मराठी माणसाला सतत प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या अखंड उर्जेला सतत प्रवाही ठेवणारी गोष्ट म्हणजे ‘हर हर महादेव’ ही शिवगर्जना! शिवाजी महाराजांचं कार्य त्यांची थोरवी याचं आकर्षण, कुतूहल आजही अनेकांच्या चर्चेचा, अभ्यासाचा विषय असतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर भारतीय भाषिकही महाराजांच्या कार्यावर संशोधन करतात. महाराजांचा हाच महिमा भव्य दिव्य स्वरूपात सर्वांसमोर येणार आहे ‘हर हर महादेव’ या चित्रपटातून. हा चित्रपट जामखेड च्या गोरोबा टॉकीज सिनेमागृहात देखील उद्यापासून प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे.


हा महिमा सर्वदूर पोहचावा यासाठीच या चित्रपटाची निर्मिती संस्था असलेल्या झी स्टुडिओजने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट उद्या पासून म्हणजे २५ ऑक्टोबर पासुन मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये एकाच दिवशी आपल्या जवळच्या सिनेमागृहात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपटांच्या इतिहासात आजवर कधीही न घडलेली अशी ही घटना हर हर महादेवच्या निमित्ताने घडणार आहे. अभिजित देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाने सजलेला हा चित्रपट दिवाळीमध्ये म्हणजे उद्यापासून सर्वांच्या भेटीस येणार आहे.

आपला मराठी सिनेमा असा भव्य दिव्य कधी बनणार ? तो इतर भाषांमध्ये कधी प्रदर्शित होणार ? याबद्दलच्या चर्चा आपण नेहमी करतो किंवा ऐकतो. या प्रश्नांना आणि चर्चांना आता एक सकारात्मक उत्तर मिळणार आहे ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या माध्यमातून. याबद्दल बोलताना झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यच इतकं महान आणि भव्य आहे की ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहू शकत नाही. महाराजांची युद्धनीती ,संघटन कौशल्य जगभरात अभ्यासलं जातं .

आज इतर भाषांमधील काल्पनिक गोष्टी आपल्याला मोहवून टाकत आहेत त्यामुळे आपला खरा, प्रेरणादायी आणि देदीप्यमान असा इतिहास तेवढ्याच भव्यतेने जगासमोर आलाच पाहिजे ही भावना आमच्या मनात होती. या भावनेतूनच आम्ही हर हर महादेव सर्व भारतात पाच भाषांमध्ये प्रदर्शित करायचं ठरवलं आहे. या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची व्हिएफएक्स टीम. अनेक हॉलिवूडपटांवर काम करणारे व्हिएफएक्स तंत्रज्ञ यावर काम करत असून तब्बल ४०० हुन अधिक तंत्रज्ञांचा यात समावेश आहे.”

चित्रपट इतिहासातील सत्य आणि प्रेरणादायी कथेवर आधारित असून, बाजीप्रभूंच्या नेतृत्वाखाली जिथे केवळ ३०० मावळ्यांनी तब्बल १२००० शत्रू सैन्याला लढा देऊन विजय मिळवला. या पराक्रमाचे वर्णन या चित्रपटात केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील हा पहिलाच बहुभाषिक चित्रपट असल्याने देशभरातील जनतेला देखील या रोमहर्षक इतिहासाचे साक्षीदार होता येणार आहे.

झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांनी केले आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर आणि सायली संजीव यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट उद्यापासून म्हणजे दि २५ ऑक्टोबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.






