नान्नज येथिल बेपत्ता रोहनचा पोलिसांनी लावला चार दिवसात शोध

जामखेड पोलिसांचे होतय सर्व स्तरातून कौतुक

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील नान्नज येथील नंदादेवी हायस्कूल येथून दि. १८ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झालेला चोभेवाडी येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा रोहन कल्याण कुमटकर यास अवघ्या चार दिवसात शोधण्यास जामखेड पोलीसांना यश आले आहे. या कामगिरीबद्दल जामखेड पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सविस्तर असे की जामखेड तालुक्यातील नान्नज येथील नंदादेवी हायस्कूल येथे इयत्ता १० वी मध्ये शिकणारा रोहन कुमटकर हा कोणाला काहीच न सांगता बेपत्ता झाला होता. मात्र त्याचे अपहरण झाले असावे असे वाटल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. सदर बेपत्ता मुलगा रोहन कुमटकर याचे वडील कल्याण कुमटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. १८ ऑक्टोबर रोजी जामखेड पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानुसार जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती यांच्याकडे सोपवला. त्यानुसार तपास करत असताना बेपत्ता झालेला मुलगा खर्डा येथे आला होता व येथे मला कुणीही नाही, मी अनाथ आहे, असे सांगितले. त्यामुळे लोकांनी त्याला सहानुभूती दाखवत एकाने त्याला दोन ड्रेस दिले. तर काही लोकांनी ५०-५०, १००-१०० रूपये दिले. असे ४००-५०० रूपये जमा झालेल्यावर त्याला कोणीतरी सांगितले की, शिक्रापूर येथे काम मिळेल त्यानुसार रोहन हा एका खासगी वाहनातून शिक्रापूर येथे गेला.

 

मिळालेल्या माहितीनुसार जामखेड पोलीसांनी शिक्रापूर गाठले. तसेच रोहनच्या तपसार्थ पोलीसांनी संपूर्ण शिक्रापूर पिंजून काढले मात्र तपास काही लागला नाही. शेवटी शिक्रापूर बसस्थानक येथे आल्यावर पोलीसांना रोहनचा शाळेचा गणवेश व काही वस्तू मिळून आल्या. यावस्तू फिर्यादीत सांगितलेल्या वर्णनाशी जुळून आल्याने रोहन या ठिकाणी आला होता अशी पोलीसांची खात्री पटली. तो याच परिसरात असावा अशी रात्री वाटल्याने पुणे येथील सर्व पोलीस ग्रुपवर याबाबत माहिती व्हायरल केली.

दरम्यान रोहन हा पुणे तालुक्यातील शुक्रवार पेठ यापरिसरात एका ठिकाणी काम मागण्यांसाठी गेला असता. तेथील मालकाने रोहन याच्याकडून घेतलेल्या मोबाईल नंबरवरून आमच्याशी संपर्क साधला. त्यानुसार पुणे तालुक्यातील शुक्रवार पेठ येथे जावून रोहन याला ताब्यात घेतले व त्याचे वडील कल्याण कुमटकर यांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती तपास अधिकारी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती यांनी दिली.

रोहनचा तपास करून कुटुंबाच्या ताब्यात दिल्याने कुमटकर कुटुंबाचा दिवाळीचा आंनंद द्विगुणित झाला आहे. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती व कर्मचारी नवनाथ शेकडे यांनी अवघ्या चार दिवसात तपास लावून रोहनला कुटुंबीयांच्या ताब्यात दिल्याने या कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. रोहनचे वडील व बाबासाहेब मांडे व मिसाळ यांनीही मोठे परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here