

शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत – रविंद्र सुरवसे
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे राज्य सरकारचे आदेश
जामखेड प्रतिनिधी : १९ ॲक्टोबर
राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार यांना दिले असून जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तालुक्यातील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना तशा सूचना दिल्या असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रविद्र सुरवसे यांनी दिली आहे.


या वर्षी परतीच्या पावसाने काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, शेतकरी चिंतेत आहेत. यंदा पेरणीनंतर पावसाने मोठा खंड दिला. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता कमी झाली. त्यातून जे पीक वाचले त्याला नंतर अतिवृष्टीचा फटका बसला. या दोन्ही संकटातून थोडेफार पीक हाती आले होते. त्यातून काही प्रमाणात लागवड खर्च निघून नुकसान कमी होईल, अशी आशा होती.


पण, ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामातील उडीद व स्वायबीन पिके शेतातच आहेत. तर काही रब्बी हंगामातील ज्वारी व कांदा ही कवळी पीके पाण्यातच आहेत. अनेकांच्या पिकात पाणी साचल्याने आता सोयाबीन काढणीस अडथळा आला आहे. त्यातच खरीप व रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे परिणामी, शेतकरी चिंतेत आहेत.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकार ने नुकसानग्रस्त अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश व तहसीलदार यांच्या सुचनेनुसार आज दि १९ आॅक्टोबर पासून हे पंचनामे सुरु होणार आहेत. तरी जामखेड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवाना विनंती आहे की आपण तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून आपले नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे. पंचनामे करत असताना आपली आपल्या मोबाईल वरून पिक पाहणीची नोंदही लगेच करून घ्यावी जेणेकरून अनुदान देणेकामी अडचण होणार नाही. तसेच जे शेतकरी आपल्या पिकाची नोंद मोबाईल वरून करणार नाहीत त्यांना अनुदान प्राप्त होणार नाही याची दखल घ्यावी असेही आवाहन भाजपा कर्जत- जामखेड विधानसभा प्रमुख रविंद्र रामनाथ सुरवसे यांनी केले आहे.






