

अखेर राजुरचे सहा.पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे यांच्यासह चौघा पोलिसांवर गुन्हा दाखल, डोक्यात गोळी झाडून घेतलेले भाऊसाहेब अघाव आत्महत्या प्रकरण
अहमदनगर प्रतिनिधी
मुळा धरणावरील सुरक्षा चौकीवर नियुक्त असलेले पोलीस कर्मचारी भाऊसाहेब दगडू आघाव (वय ५२) यांनी सर्व्हिस बंदुकीतून स्वत:च्या गळ्यावर गोळी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेपुर्वी आघाव यांनी चिठ्ठी लिहून ठेवलेली असल्याने आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, ही भूमिका नातेवाईकांनी घेतली. राहुरीच्या मुळा धरण प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पोलिस चौकीत शनिवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.


अखेर रात्री उशिराने या प्रकरणी
अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे, सहाय्यक फौजदार निमसे, महिला कॉन्स्टेबल राऊत, शिवाजी फुंदे (पोलिस मुख्यालय) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी मागणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.


भाऊसाहेब आघाव बारागाव नांदूर येथील रहिवाशी आहेत. गेल्या ६ महिन्यापुर्वी मुख्यालयातुन राहुरीच्या मुळा धरणावर त्यांची बदली झाली होती. शनिवारी सकाळी बारागाव नांदूर येथील घरातुन निघालेले भाऊसाहेब आघाव सव्वानऊ वाजता मुळा धरणावरील सुरक्षा चौकीत कामावर हजर झाले. माञ चौकीच्या रूममध्ये गोळीबाराचा आवाज झाल्याने पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली.

पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खबर देताच पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा आघाव यांच्या गळ्यातून डोक्यात घुसलेली गोळी रूमच्या छताला असलेल्या पञ्याला छेद देऊन बाहेर गेली होती. आघाव यांनी चिठ्ठी लिहून ठेवल्याची तसेच सकाळी ९ वाजुन ४१ मिनिटाने मी आत्महत्या करत असल्याचा मेसेज मुलगा पंकजच्या मोबाईलवर पाठवल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली.

मृतदेह घेण्यास नकार
पोलिस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही. ही भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने पोलिस प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाईकांनी धरणे आंदोलन मागे घेतले. रात्री आठ वाजेच्या सुमारास लोणी येथील रुग्णालयातून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिस ठाण्यात धरणे
अकोले पोलिस स्टेशनच्या तीन पोलिस कर्मचारी व एका अधिकाऱ्याकडून खंडणीच्या मागणीला कंटाळून आघाव यांनी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. हा मजकुर समजताच नातेवाईकांनी शनिवारी सायंकाळपर्यंत राहुरी पोलिस स्टेशनच्या आवारात रात्री साडेसात वाजेपर्यंत धरणे धरून संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही ही भूमिका घेतली.

गोळी सापडली नाही
भाऊसाहेब आघाव यांनी चिठ्ठी लिहून ठेवली. तसेच सकाळी ९ वाजुन ४१ मिनिटाने मी आत्महत्या करत असल्याचा मेसेज मुलगा पंकजला मोबाईलवर पाठवला. घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी मुळा धरणावरील सुरक्षा चौकीला भेट देऊन घटनेची पाहणी केली. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व कर्मचाऱ्यांनी चौकीच्या परिसरात दुपारपर्यंत गोळीचा शोध घेतला. मात्र बंदुकीतुन फायर झालेली गोळी सापडली नव्हती.

पोलिस आरोपींची नावे सांगेनात
आघाव यांच्या संतप्त नातेवाईकांनी शनिवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत राहुरी पोलिस स्टेशन समोर ठिय्या मांडला. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, ही भूमिका घेतल्याने राहुरी पोलिसांनी अकोला पोलिस स्टेशनचे २ पोलिस १ महिला कर्मचारी व १ अधिकाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे व खंडणीची मागणी या कलमानुसार गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पत्रकारांना दिली. आरोपींची नावे मात्र त्यांनी सांगितली नाही.




