

शाळकरी विद्यार्थींना दोन तरुणांनी गाडीत बसवले, घर जवळ येताच गाडी थांबली नाही, जवळच्या तालुक्यात घडली धक्कादायक घटना
अहमदनगर : मुले पळवणारी टोळी आली आहे अशा अफवांचे व्हीडिओ व फोटो सोशल मिडीयावर फीरत आहेत. मात्र आज श्रीगोंदा येथे एक वेगळीच व धक्कादायक घटना घडली आहे. शाळकरी मुलांच्या अपहरण करण्याच्या संशयावरून दोघांना जबर मारहाण करून, त्यांच्या गाडीचे नुकसान करण्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली असून या प्रकरणी त्या दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या बाबत घडलेली घटना अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज (आनंदवाडी) येथील समर्थ गणेश यादव (वय वर्षे ११) हा काष्टी येथील विद्यालयात इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत आहे. शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी अजनुज काष्टी चौकात येऊन तो थांबला , त्याच दरम्यान विना क्रमांकाची स्विफ्ट डिझायर गाडी येऊन थांबली. त्या चौकातून तीन मुले गाडीत बसले. गाडीतील दोन मुलांना गणेशा व माळवाडी या गावात सोडले. गाडी खरातवाडी शिवारात आली असता आरोपी हरिभाऊ दत्तू वाळुंज याने समर्थ याला दहा रुपये गाडीचे भाडे दे असे म्हणाला परंतु समर्थ यांच्याकडे पैसे नव्हते, यावेळी हरिभाऊ त्याला म्हणाला तुझ्या किडन्या काढून घेतो , आणि काहीतरी शस्त्र देखील त्याला दाखवले. यामुळे समर्थ घाबरला व रस्ता खराब असल्याने गाडीचा वेग कमी होताच समर्थ यादव याने गाडीतून उडी टाकली व रस्त्या लगत असलेल्या अशोक वाघमोडे यांच्या घरी धाव घेतली. तेथे घडला प्रकार सांगितला.


यानंतर नातेवाईकांनी ही पांढऱ्या रंगाची गाडी पुढील गावांमध्ये थांबवण्यास सांगितले व घडलेला प्रकार सांगितला. ही बाब आनंदवाडी येथील ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी रस्त्यात येत ही गाडी अडवली. ग्रामस्थांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता गाडीत मद्य धुंद अवस्थेत असलेल्या दोन तरुणांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. गाडीची तपासणी केली असता गाडीच्या चार क्रमांक पाट्या, मद्याच्या बाटल्या व इतर साहित्य मिळून आले. महाराष्ट्र शासन नाव असलेल्या दोन पाट्या मिळून आल्या. ग्रामस्थांनी या दोन्ही संशयिताची येथेच्छ धुलाई केली.

घटनेची माहिती श्रीगोंदा पोलिसांना कळताच पोलीस उपनिरीक्षक अभंग यांच्यासह अंकुश ढवळे, किरण बोराडे, प्रताप देवकाते, भरत इंगवले, रवि जाधव यांचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जमावाला शांत करत सदर संशयितांना ताब्यात घेतले.

दरम्यान या प्रकरणी गणेश यादव यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गुलाब पठाण वय (२८) रा, काष्टी.ता.श्रीगोंदा व हरिभाऊ दत्तू वाळुंज वय (२७) वर्षे रा. पिंपळगाव तुर्क, ता.पारनेर या दोघांच्या विरोधात अपहरण, फसवणूक व अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामस्थांनी देखील दोघांना मारहाण केल्याप्रकरणी ग्रामस्थांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार हे तरूण स्थानिकच आहेत. त्यांच्या चौकशीत ते मुलाला केवळ गंमत म्हणून घाबरवत असल्याचे पुढे आलं आहे. मात्र, त्यांनी तसे केल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला. शिवाय त्यांच्या वाहनाबद्दल पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्यांची अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.





