

जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव ओव्हरफ्लो
जामखेड प्रतिनिधी
घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे जामखेड शहराची जीवनदायी असलेला भुतवडा तलाव आज दि २६ रोजी सकाळी शंभर टक्के भरला. तलाव भरला आसल्याने सांडवा ओसंडून वाहत आहे. अनेक दिवसांपासून शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता तलाव भरल्याने परिसरातील शेतकरी व शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


भुतवडा तलाव हा ११९ दशलक्ष घनफूट आहे तर नवीन जोडतलावाची पाणी साठवणूक ४८.२५ दशलक्ष घनफूट आहे जोडतलाव भरल्यावर ते पाणी भुतवडा तलावात येते दोन्ही तलाव शंभर टक्के भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्य़ातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे बीड जिल्ह्य़ातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ रामेश्वर धबधब्याच्या वरती असलेला भुरेवाडी तलाव मागिल दहा दिवसांपूर्वीच भरला होता. त्यामुळे खाली आसलेल्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतावडा तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होत होता. आज सोमवार दि २६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी आखेर भुतवडा तलाव १०० टक्के भरला अशी माहिती जामखेड चे लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता उमेश कंगणकर साहेब यांनी दिली.तलाव ओव्हरफ्लो झाल्याने मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे विंचरणा नदीतुन खाली जामखेडकडे पाणी वाहत आसल्याने काझेवाडी व रत्नापूर तलावातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.

भुतवडा तलाव यावर्षी उशीर भरला असून यापूर्वी तो आॅगस्ट महिन्यात भरत होता. पावसाळा संपत आला तरी तलाव भरत नसल्याने जामखेडकर चिंतेत होते. हा तलाव भरल्याने सध्या तरी जामखेडकरांची चिंता मिटली आहे.

तालुक्यातील हे तलाव देखील १०० टक्के भरले
जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतावडा तलावा बरोबरच पिंपळगाव आवळा, जवळके, धोंडपारगाव, मोहरी व खैरी हे तलाव देखील मागिल काही दिवसांपुर्वीच शंभर टक्के भरल्याने ओसंडून वाहत आहेत. आता तलाव भरले आसल्याने शेतकरी सुरू आसलेल्या पाऊस कधी थांबतोय याची वाट बघत आहे.





