नगर आष्टी रेल्वे आली, घाटनांदूर- जामखेड – श्रीगोंदा रेल्वेमार्गाचा प्रश्न कधी लागणार मार्गी ? जामखेडच्या आम आदमी पार्टी च्या वतीने दिले रेल्वे मंत्र्यांना निवेदन

जामखेड प्रतिनिधी (अविनाश बोधले)
दि २४ सप्टेंबर २०२२

नुकतेच नगर ते आष्टी रेल्वे मार्गाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडले मात्र गेल्या आनेक वर्षापासून प्रतिक्षेत आसलेल्या घाटनांदुर जामखेड श्रीगोंदा या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण होऊन ६ वर्षे लोटली आसली तरी अद्याप अंबाजोगाई, केज, पाटोदा, जामखेडच्या नागरिकांचे स्वप्न प्रत्यक्षात कधी साकारणार? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. सदर रेल्वे मार्गास मंजुरी मिळावी यासाठी नुकतेच जामखेड आम आदमी पार्टी च्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आष्टी या ठीकाणी निवेदन देण्यात आले.

नगर ते आष्टी या नविन रेल्वे मार्गाचे उद्घाटन नुकतेच आष्टी या ठीकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडले. त्यामुळे आष्टी करांचे स्वप्न पूर्ण झाले आसे म्हणायला हरकत नाही. घाटनांदूर ते श्रीगोंदा यादरम्यान अंदाजे २६५ किलोमीटर अंतर आहे. घाटनांदूर ते श्रीगोंदा (जि. अहमदनगर) या रेल्वेमार्गासाठी सहा वर्षांपूर्वी सर्वेक्षण पार पडले. मात्र, सर्वेक्षणानंतर पुढे कुठलीही हालचाल न झाल्याने नागरीकांच्या समृद्धीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या मार्गाचे भिजत घोंगडे पडले आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने सन २०१५ मध्ये अर्थसंकल्प सादर करताना तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घाटनांदूर (जि. बीड) ते श्रीगोंदा (जि.अहमदनगर) हा नवीन रेल्वेमार्ग जाहीर करून या मार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी ३४ लाख रुपयांची तरतूद जाहीर केली होती. त्यानुसार पुढील आठ महिन्यांच्या कालावधीत सन २०१६ मध्ये रेल्वे प्रशासनाने या नियोजित रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम घाटनांदूर रेल्वेस्थानकातून सुरू केले. घाटनांदूर व अंबाजोगाई शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात खुंटे रोवण्यात आले होते. तसेच पुढे केज पाटोदा व जामखेड पर्यंत अनेक वेळा रेल्वे मार्गाच्या अनुशंगाने मोजमाप देखील करण्यात आले. मात्र पुढे कसलीच हालचाल झाली नसल्याने पुन्हा या रेल्वे मार्गाचा सर्वांना विसर पडला.

दुसरे म्हणजे, कालच नगर ते आष्टी रेल्वे मार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते संपन्न झाले.या दरम्यान जामखेड च्या आम आदमी पार्टी ने पुन्हा या घाटनांदुर जामखेड श्रीगोंदा रेल्वेमार्गाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या बाबत त्यांनी हा रेल्वेमार्ग व्हावा यासाठी नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेबजी दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले. या मध्ये म्हंटले आहे की जामखेड शहर हे एक महत्त्वाचे तालुका मुख्यालय आहे आणि अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक अतिशय प्रसिद्ध व्यवसाय केंद्र आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर चोंडी जन्म स्थळ आहे. या नवीन रेल्वे प्रकल्पामुळे या सर्वात मागासलेल्या भागाच्या आर्थिक, व्यावसायिक, औद्योगिक आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळेल आणि रेल्वे विभागाला निश्चितपणे खूप मोठा महसूल मिळेल. यावेळी जामखेड चे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते बजरंग सरडे ,संतोष नवलाखा,अजय भोसले सहआदि कार्यकर्ते उपस्थित होते.

हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास न्यायचा असेल तर जनरेट्याबरोबरच राजकीय इच्छा प्रबळ असणे अत्यावश्यक आहे. याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करून नागरिकांची व व्यापाऱ्यांची गरज असल्याचे निदर्शनास आणणे आवश्यक आहे. सर्व राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक, इत्यादींनी मतभेद बाजूला ठेवून संबंधित मंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करावा. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण व्हायला हवा, अन्यथा सर्व्हे होऊनही फक्त केज, पाटोदा व जामखेड तालुक्यातील नागरिकांना फक्त घोषणाच ऐकाव्या लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here