पुणे :जिल्हा परिषद, महानगर पालिका, ग्रामपंच्यायती नंतर आता राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. बाजार समित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र अशा २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर करण्यात आला आहे. बुधवारपासून (दि ७) पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी व मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

प्राधिकरणाने ६ आणि २१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार निवडणूकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु केल्या होत्या. मात्र, कृषी पत संस्थांच्या निवडणूकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका सुरु करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर १३ याचिका दाखल झाल्या होत्या.


त्याअनुषंगाने उच्च न्यायालयाने निवडणूकीस पात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूका तातडीने पूर्ण करुन त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका पूर्ण करण्याबाबत १८ नोव्हेंबर २०२१ रोजी आदेश दिले. त्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरणाने आज निवडणूक कायक्रम जाहीर केला आहे.

बाजार समितीच्या निवडणूकीकरीता बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पत संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळे या सदस्यांची सूची २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत. याशिवाय बाजार क्षेत्रातील परवाना धारक व्यापारी, आडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार असल्यामुळे या मतदारांची यादी १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित बाजार समित्यांना दिलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here