बीड प्रतिनिधी

गुटख्याचा कंटेनर पकडायला पाठविलेल्या पोलिसांनीच कंटेनरमधील तब्बल 23 पोते गुटखा पसार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर यांच्यासह तीन पोलिसांवर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.

बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसात सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने गुटख्याच्या अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. दुसर्‍या बाजूने मात्र अनेक ठिकाणी गुटख्या व्यापार्‍यांना काही पोलिसांचेच अभय असल्याची चर्चा सातत्याने होत असते. त्याचा प्रत्यय आता पाटोदा येथील कारवाईत आल्याचे दिसत आहे. 4 दिवसापूर्वी पाटोदा परिसरात गुटख्यावर कारवाई करण्यात आली होती. वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाटोदा पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना गुटख्याच्या कंटेनरची माहिती देऊन तो अडवायला सांगितले होते. मात्र पोलिसांनी तो अडवल्यानंतर त्यातील 50 पोते गुटख्याऐवजी कारवाईत केवळ 27 पोते गुटखा दाखविला आणि 23 पोते गुटखा हुले कन्स्ट्रक्शन कार्यालयात पसार केला. हि बाब समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सहायक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर, पोलीस संतोष क्षीरसागर आणि कृष्णा डोके यांना निलंबित केले आहे. त्यांच्या निलंबन आदेशातच हे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here