जामखेड प्रतिनिधी
एकीकडे शिक्षक बँकेच्या निवडणुकीचे राजकारण तापत असतानाच दुसरीकडे गुरुकुल मंडळाचे संजय कळमकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते विजयकुमार जाधव यांनी शिक्षक समितीच्या तालुकाध्यक्षपदाचा ऐनवेळेस राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चाना उधाण आले असून बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रबळ उमेदवार असतानाही जाधव याना उमेदवारी नाकारल्यानेच राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे जाधव यांनी घरगुती कारणाने राजीनामा दिला असून आपण गुरुकुल मंडळाचेच काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वच शिक्षक संघटना आणि प्रशासनाची तयारी सुरू असतानाच, राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालानुसार आता 30 सप्टेंबरपर्यंत बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक संघटना आणि उमेदवारांचाही हिरमोड झाला आहे. मात्र निवडणूक पुढे ढकलण्यापूर्वी उमेदवाऱ्या जाहीर करण्यात आल्या होत्या,मध्ये जामखेड तालुकाध्यक्ष विजय जाधव यांनी २ वर्षांपासून शिक्षक बँक निवडणुकीची तयारी केली होती,जिल्हास्तरीय नेत्याकडूनही जाधव यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत होते मात्र असे असतानाच ऐनवेळेस जाधव यांची उमेदवारी टाळण्यात आल्यामुळे जाधव यांनी शिक्षक समिती तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे विजयकुमार जाधव यांनी कोरोना काळात कोरानातून बचावून यायच्या आधी आणि नंतरही आंतरजिल्हा शिक्षक बांधवांसाठी शिक्षकांना कोरोना ड्युटीतून दिलासा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.तसेच शिक्षकांची विविध बिले, प्रशासकीय कामे , यामध्ये जाधव नेहमी अग्रेसर होऊन कामे करत होते.बँक निवडणुकीत त्यांनी चांगली तयारी केली होती,मात्र असे असतानाच उमेदवारी न दिल्याने जाधव नाराज झाल्याचे बोलले जात आहे,त्यामुळे जाधव यांच्या गटातील शिक्षकांमध्ये उमेदवारी न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटला आहे .त्यामुळे ही नाराजी मंडळाचे नेते संजय कळमकर हे कशाप्रकारे दूर करतात याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

चौकट
संजय कळमकर हेच माझे नेते आहेत.
मला उमेदवारी नाकारल्याने मी पदाचा राजीनामा दिला नसून माझ्या वैयक्तिक कारणामुळे आणि नवीन होतकरू शिक्षक बांधवांना संधी मिळावी यासाठी शिक्षक समितीच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे,गुरुकुल मंडळाचे नेते संजय कळमकर हेच माझे नेते असून आगामी काळात गुरुकुल मंडळाचेच काम करणार असल्याचे विजयकुमार जाधव यांनी सांगितले.


