केज प्रतिनिधी

इनोव्हा व रिक्षाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत मोठी जीवितहानी झाली आहे. या अपघातात चौघे जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा भीषण अपघात केज -अंबाजोगाई रस्त्यावर होळ शिवारात आज (दि.२) सायंकाळी साडेपाच वाजता घडला.

मच्छिंद्रसिंग चरणसिंग बोके (वय ३५ रा.केज) असे रिक्षातील प्रवाशाचे तर बालाजी संपती मुंडे (वय २८ रा.पिसेगाव ता.केज) अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय दोन बालके (नावे समजू शकली नाहीत) मृत झाली. तसेच, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा गाडीची (एम.एच.१६ सी.एन.७००) व समोरून येत असलेल्या रिक्षाची (एम.एच.२३ एक्स ५२२) जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचे दोन तुकडे झाले आहेत. खाजगी वाहने व रुग्णवाहिकांमधून जखमींना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात तातडीने आणण्यात आले आहे. घटनास्थळी अपघातामुळे वाहतूक खोळंबली होती. युसूफवडगाव पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार दोन्ही वाहनातील १० हून अधिक व्यक्ती जखमी झाले आहेत. यापैकी जखमींचा अधिकृत आकडा व नावे समजू शकलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here