जामखेड प्रतिनिधी

कर्जत जामखेड हे दुष्काळाचे फार मोठे दुखणे आहे. इतक्या वर्षांत येथील दुष्काळाचा प्रश्न सुटला नाही. मात्र, अलीकडे तुम्ही रोहित पवार या तरुण आमदाराला संधी दिली आणि कामाला सुरवात झाली. येथील पाणी प्रश्न एमआयडीसी सोडविण्यासाठी त्यांनी मंत्र्यांसोबत बैठका घेऊन नियोजन केले आहे. लवकरच कर्जत जामखेड चा पाणी व एमआयडीसी चे काम मार्गी लागणार आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी चौंडी येथे व्यक्त केले.

जाहीरात

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. या वेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आ. रोहित पवार, आ. संग्राम जगताप, निलेश लंके, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, भुषणराजे होळकर, नारायण आबा पाटील, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, रोहीत पाटील, आदित्य फतेपरकर इंदौर अविनाश शिंदे, धनराज कोपनर, चौंडी चे सरपंच सुनिल उबाळे, सह अनेक अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार साहेब म्हणाले की ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी रस्ते, पाणी आणि रोजगार वाढीसाठी प्रयत्नपूर्वक कामे केली. या भागातील जनतेने साथ दिली तर पाच वर्षांत मतदारसंघाचा चेहरा बदलल्याचा इतिहास येथे घडला जाईल,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले नातू आमदार रोहित पवार यांचे कौतुक केले. ‘देशातील महिलांना सन्मान मिळवून देणारा हा सोहळा आहे. आपल्या देशात अनेक मान्यवर महिला होऊन गेल्या. त्यापैकी राजमाता जिजाबाई, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे नाव सर्वत्र अग्रक्रमाने घेतले जाते. मला तुलना करायची नाही. मात्र यामध्ये अहिल्यादेवी यांचे कार्य सर्वसमावेशक आहे. जिजाबाईंनी छत्रपती शिवरायांना घडवून स्वराज्याची स्थापना करण्याची प्रेरणा दिली. सावित्राबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाची दारे खुली करून दिली. तर अहिल्यादेवी होळकर यांनी कौटुंबीक संकटाच्या काळात राज्य हातात घेऊन वेगळ्या प्रशासकीय कौशल्याचा ठसा उमटविला. आपल्या हाती आलेल्या सत्तेचा जनतेच्या हितासाठी कसा वापर करता येतो, हे त्यांनी दाखवून दिले. महिलासंबंधी त्यांनी अनेक हितकारक निर्णय घेतले. सर्वधर्मसमभाव प्रत्यक्षात आणून काम केले. त्यांचे हे काम परिवर्तनाला चालना देणार होते,’ असे पवार यांनी सांगितले.

या वेळी समस्त धनगर समाजाच्या वतीने शरद पवार यांचा काठी आणि घोंगडी देऊन पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. तर चौंडी ग्रामस्थांच्या वतीनेही मोठा पुष्पहार घालून पवार यांचा सत्कार करण्यात आला. चौंडी येथे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आ. रोहित पवार यांनी बोलताना सांगितले की मागील पाच वर्षांत चौंडीतील विकास कामे थांबली होती. गेल्या दोन वर्षांत ती पुन्हा मार्गी लागली, असं म्हणत रोहित पवार यांनी भाजप नेते राम शिंदे यांनी टोला लगावला आहे. चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मराठा आणि धनगर आरक्षणाचा मार्ग सुकर होण्यासाठी केंद्रात आपलं वजन वापरण्याची विनंती केली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या पण सध्या जीर्ण झालेल्या वास्तूंचा सरकारने जीर्णोद्धार करावा. सोलापूरमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राला जादा निधी द्यावा. तसंच आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा वाढविण्यासाठी शरद पवार यांनी आपले वजन वापरून केंद्र सरकारकडे प्रयत्न करावेत. त्यामुळे मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

मी संयोजक नाही, केवळ एक कार्यकर्ता

चौंडीतील आजच्या अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाचा मी संयोजक नाही, कार्यक्रम समितीने आयोजित केला आहे, मी केवळ एक कार्यकर्ता, असं रोहित पवार यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. देशात १३० पेक्षा जास्त मंदिरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली, महिलांची सोय व्हावी यासाठी कित्येक ठिकाणी नदीवर घाट बांधले. दुष्काळात मंदिर किंवा घाट बांधण्याचे काम करून त्यांनी रोजगारही उपलब्ध करून दिला.

अहिल्यादेवींच्या राज्यात धार्मिक आणि जातीभेद नव्हता. हल्लीच्या राजकारण्यांनी त्यांच्याकडून ही शिकवण घ्यावी, असा टोला रोहित पवार यांनी आपल्या राजकीय विरोधकांना लगावला आहे. मागील पाच वर्षांत चौंडीतील विकास कामे थांबली होती. गेल्या दोन वर्षांत ती पुन्हा मार्गी लागली. भविष्यात चौंडीत अहिल्यादेवींचे संग्रहालय उभारण्याचे नियोजन आहे, असंही ते म्हणाले. या वेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आण्णा डांगे, सह अनेकांची भाषणे झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here