जामखेड प्रतिनिधी
कायदा सुव्यवस्था राबवताना जनतेचे सहकार्य गरजेचे असते. मात्र जो कायदा मोडेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिला आहे.
बुधवारी (दि १८ ) जामखेड पोलिस स्टेशन च्या वतीने व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाधव बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी ,नगरसेवक अमित चिंतामणी, मोबाईल असोसिएशनचे सुनील जगताप, अमोल चिंतामणी, प्रफुल्ल सोळंकी, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, अमोल तातेड, अनुराग गुगळे , उद्योजक समीर चंदन, तेजस बोरा ,मंगेश बेदमुथा, संजय मुळे, अभय शिंगवी, अजय कोठारी, पिंटू बोरा, दादा कलासागार,अशोक बाफना, श्रीकांत कुलथे,ऋतुराज फुटाणे, सार्थक कोठारी यांच्यासह
व्यापारी उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव म्हणाले, शहराचा सर्वे करून चांगली योजना व्यापाऱ्यांसाठी राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. शक्य झाल्यास पि -वन, पि-टु ची पार्किंग व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे. ट्राफिक नियमाचें चौकाचौकात बोर्ड लावण्यात येतील, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांचे कार्य चांगले आहे असे व्यापारी मधून सुर निघाल्यानंतर आम्हाला पण बरे वाटले असे सांगुन जाधव म्हणाले , शनिवारी बाजार दिवशी पाकीटमार, मोबाईलचोर आणि गाडी चोरांवर प्रतिबंध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक व्यापाऱ्यांनी सी सी टी व्ही लावून पोलिसांना पुटेज देण्यास मदत करावी.असे त्यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले, मी आल्यापासून चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे, आमचा पोलीस स्टाफ प्रत्येक बाजार दिवशी सिविल ड्रेस मध्ये फिरत असतात आणि मोबाईल चोर, पाकीटमार आणि मोटरसायकल चोर यांच्याकडे लक्ष ठेवून त्यांना पकडत असतात, त्यामुळे खूप वचक बसला आहे, पार्किंग व्यवस्थेमध्ये आम्ही दोऱ्या लावल्या त्यामुळे९० टक्के अडचण दूर झाली, तेव्हापासून ट्राफिक जाम होतच नाही तसेच बीड रोड वरील सी एन जी पंपा लगत सी एन जी भरण्याकरता ग्राहक रोडवर गाड्या लावतात त्यासाठी संबंधितास सांगून त्यांची पर्यायी व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी आपल्या शॉपमध्ये सीसीटीव्ही बसवावे व रात्री शॉप बंद झाल्यावरही दुकांच्या बाहेर एक लाईट चालू ठेवावी, जेणे करून आम्हालाही गस्तीत अडचण येणार नाही.. तसेच मोटरसायकल व बुलेट ला जे नळ्या काढून गाडी पळवतात लोंकाना त्रास होतो त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले, पोलिस निरीक्षक गायकवाड आल्यापासून जामखेडच्या लोकांना , व्यापाऱ्यांना शिस्त लागली आहे. रहदारीस अडथळा होऊ नये म्हणून त्यांनी दोऱ्या लावल्या होत्या त्यामुळे ९० टक्के लोकांमध्ये जनजागृती झाली आहे. लोक रस्त्यावर गाड्या लावत नव्हते. मात्र आता ट्राफिक सुरळीत होण्यास मदत झाली. चोऱ्या करणारास वचक बसला आहे. जामखेड चा मेन रोड जयहिंद चौक ते विठ्ठल मंदिर २२ (फूट रुंद )बाय ६५० ( सहाशे पन्नास) लांब रोड होता आता तो पंधरा फूट वापरण्यात राहिला आहे त्यामुळे रहदारीस अडचण होत आहे. रोडवर अथवा व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर पार्किंग करणारास कारवाई करावी असे संजय कोठारी यांनी मागणी केली.
यावेळी मोबाईल असोसिएशनचे सुनील जगताप म्हणाले पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड आल्यापासून सगळ्यांना चांगले नियम माहीत झाले आहेत, जामखेड शहरातील व्यवसायिकांना गावगुंडांचा होणारा त्रास संपला आहे. पण मध्यवस्थित पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे, पेठेतील रस्ता वनवे करावा अशी मागणी त्यांनी केली.
चौकट –
संजय कोठारींचे काम उल्लेखनीय
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी आपल्या भाषणात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या कार्याचा गौरव करतानाच, कोठारी यांच्यामार्फत पोलिसांना होणारी मदत खरोखर उल्लेखनीय असल्याचे सांगितले. कोठारी यांचा खरोखर सन्मान करण्यासारखे आहे. पोलिसांच्या अगोदर त्यांना फोन जातो आणि ते ताबडतोब स्वतः रुग्णवाहिका घेऊन जाऊन अपघातग्रस्तांना वेळेत रूग्णालयात पोहोच करून त्या व्यक्तीचा प्राण वाचवतात. हे कार्य खरोखरच वाखाणण्यासारखे आहे.





