कर्जत प्रतिनिधी
कर्जत नगरपंचायत मधील चार प्रभागासाठी ८७ टक्के मतदान झाले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजित थोरबोले व सहाय्यक अधिकारी नानासाहेब आगळे यांनी दिली. आता या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
कर्जत नगरपंचायत निवडणूक या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांच्यामुळे संपूर्ण राज्यभर यामध्ये गाजली. यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे केवळ जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणी उद्या बुधवार दि १९ रोजी सकाळी दहा वाजता कर्जत तहसील कार्यालय मध्ये सुरू होणार आहे . दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व निकाल लागतील.
कर्जत नगरपंचायत ४ प्रभागांची निवडणूक नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे स्थगित झाली होती, परंतु सर्वसाधारण जागेवर या सर्व जागांसाठी मतदान घेण्याची परवानगी मिळाल्यामुळे या सर्व जागांवर निवडणूक घेण्यात आली. सुरुवातीला तेरा जागांसाठी निवडणूक झाली होती. उर्वरित चार जागांसाठी आज मतदान झाले.
चारही प्रभागांमध्ये मोठ्या उत्साहात मतदारांनी मतदान केले. सर्व मतदान केंद्रावर मतदानासाठी दिवसभर गर्दी पाहावयास मिळाली. चार प्रभागांमधील मतदानासाठी पाच मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. मतदानासाठी मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत गाड्यांमध्ये भरून मतदानाच्या ठिकाणी कार्यकर्ते घेऊन येताना दिसत होते. प्रथमच मतदान करणाऱ्या पासून ते वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वांनीच मतदानासाठी आणण्यात येत होते.
आज ज्या प्रभागांमध्ये मतदान झाले यामध्ये एकूण मतदार संख्या ३३२० होती , त्यापैकी २८९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वात जास्त मतदान प्रभाग क्रमांक एक गायकरवाडी या ठिकाणी ९७.४७ टक्के झाले आहे. प्रभाग क्रमांक 3 ढेरे मळा येथे ८७ टक्के, प्रभाग क्रमांक पाच पोस्ट ऑफिस परिसर ८४.७४ टक्के, प्रभाग क्रमांक सात बुवासाहेब नगर ८०.०५ टक्के असे मतदान झाले आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सर्व मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये एक जागा बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित १६ जागांसाठी उद्या बुधवारी सकाळी दहा वाजता कर्जत तहसील कार्यालया मध्ये मतमोजणी होणार असून मतदानाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे प्रथम पहिले एक ते आठ प्रभागांची मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीच्या एकूण दोन फेऱ्या होतील. अशी माहिती प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी दिली.






