मुंबई : कामावर रुजू न झाल्यास शुक्रवारपासून (२४ डिसेंबर) पुन्हा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नियमानुसार निलंबन, बडतर्फीसारख्या कारवाईला सुरुवात होईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर अद्यापही ठाम आहेत. संपाची नोटीस देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने सोमवारी संप मागे घेण्याची घोषणा एसटी महामंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर केली. यावेळी निलंबन, बडतर्फी, सेवा समाप्ती अशी कारवाई मागे घेण्यावर चर्चाही झाली. दोन दिवसांत कामावर रुजू होण्याचे आवाहनही पत्रकार परिषदेत महामंडळाने केले. महामंडळाने कारवाया मागे घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी यासंदर्भात परिपत्रक काढले. त्यानुसार २३ डिसेंबपर्यंत कर्तव्यावर हजर होण्यास सांगण्यात आले आहे. मात्र कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमीच आहे.

यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी २३ डिसेंबर ही अंतिम मुदत असल्याचे सांगितले. कामावर न परतल्यास शुक्रवारपासून कर्मचाऱ्यांवर पुन्हा कारवाई होईल. त्यामुळे कारवाई होण्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचे आवाहन महामंडळाकडून केले जात असल्याचे चन्ने यांनी सांगितले.

८९ हजार कर्मचाऱ्यांची हजेरी

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने सोमवारी संप मागे घेतला आणि महामंडळानेही कारवाया मागे घेतल्या जातील, असे आश्वासन दिले.

त्यानंतर २१ डिसेंबरला एकूण हजर एसटी कर्मचाऱ्यांची संख्या २० हजार ९३४ नोंदवली गेली, तर २२ डिसेंबरला २१ हजार १६१ कर्मचारी हजर असल्याचे सांगितले. २० डिसेंबरला ही संख्या २० हजार ४०१ होती. त्यामुळे संप मागे घेतल्यानंतरही कामावर हजर होणाऱ्यांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. महामंडळात हजेरी पटावरील कर्मचाऱ्यांची संख्या ८९ हजार ५४८ आहे. मंगळवारी १२२ एसटी आगार पूर्ण बंद होते. बुधवारी हीच संख्या ११६ पर्यंत पोहोचली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here