नवी दिल्ली: दिल्ली सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या मोहल्ला क्लिनिकमधून देण्यात आलेलं कफ सीरप सेवन केल्याने १६ चिमुकल्यांना साइड इफेक्ट झाला असून त्यातील ३ मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. चार वर्षांखालील मुलांना डेक्स्ट्रोमेथोर्फन हे कफ सीरप देऊ नये अशी स्पष्ट सूचना असतानाही हे सीरप दिले गेल्याने हा प्रकार घडल्याचेही स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणाची गंभीर दखल घेत तीन डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेवरून राजकारण सुरू झाले असून भाजपने आम आदमी पक्षावर ढिसाळ कारभाराचा आरोप केला आहे.

दिल्ली सरकारच्या वतीने अनेक भागांत मोहल्ला क्लिनिक चालवण्यात येत असून या क्लिनिकमधून लिहून देण्यात आलेलं सीरप घेतल्यानंतर एकूण १६ लहान मुलांवर साइड इफेक्ट झाला. या सर्व मुलांना कलावती सरन बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालकांनी याची गंभीर दखल घेत तातडीने दिल्ली सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. डेक्स्ट्रोमेथोर्फन हे कफ सीरप सेवन केल्यानंतर हा त्रास झाल्याचे निर्दर्शनास आले असून त्याआधारावर हे सीरप चार वर्षांखालील मुलांसाठी प्रीस्क्राइब न करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व मोहल्ला क्लिनिकना देण्यात यावेत असे आरोग्य सेवा महासंचालकांनी दिल्ली सरकारला सांगितले आहे. याशिवाय याबाबत ड्रग कंट्रोलर यांनाही सूचना देण्यात आली आहे. कफ सीरपच्या साइड इफेक्टने तीन मुले दगावल्याचे समोर आल्यानंतर दिल्ली सरकार हादरलं आहे. याप्रकरणी सरकारकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. याबाबत आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी माहिती दिली. ते म्हणाले, याप्रकरणी तीन डॉक्टरांना टर्मिनेट करण्यात आले आहे. त्याचवेळी या प्रकरणाची चौकशी डीएमसीकडे देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here