अहमदनगर प्रतिनिधी

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी अहमदनगरच्या भुईकोट किल्ला मैदानातून तिरंग्याला सलामी देत आणि महात्मा गांधीना अभिवादन करून समाजसेवक अण्णा हजारे, जेष्ठ गांधीवादी (स्व.)डॉ एस.एन. सुब्बाराव, पद्मश्री पोपटराव पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अहमदनगर ते नवलाखी(बांगलादेश) सदभावना सायकल यात्रेचा शुभारंभ झाला होता. या सायकल यात्रेचे संपूर्ण नियोजन आणि नेतृत्व विशाल अहिरे यांच्याकडे होते. यात्रा पूर्ण सुरक्षित आणि यशस्वीपणे हाताळण्यात विशाल अहिरे यांनी मोठे कष्ट घेतले. मात्र दुर्दैवाने शनिवारी रात्री ओरिसा राज्यात भुवनेश्वर जवळ ते ज्या एम्ब्युलन्स मधून प्रवास करत होते त्या एम्ब्युलन्सला भीषण अपघात झाला आणि त्यात विशाल अहिरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झालेत.

विशाल अहिरे हे स्नेहालयच्या युवा निर्माण चे समनव्यक होते. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीच ते परस्थितीने स्नेहालयात दाखल होत शिक्षण सुरू केले. ते मूळचे श्रीरामपूरचे रहिवासी होते. त्यांच्या मागे वृद्ध वडील, एक भाऊ आणि एक बहीण आहे. स्नेहालयात दाखल झाल्यानंतर एकीकडे शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्नेहालयच्या विविध कामात सहभाग घेण्यास सुरुवात केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर पूर्णवेळ त्यांनी स्नेहालयला देत काम सुरू केले. युवा निर्माण चे ते समनव्यक होते. या माध्यमातून युवकांना खेळ, नोकरी,व्यवसाय आदी विषयांवर मार्गदर्शन करत अनेक युवकांना उभे केले. स्नेहालयची युवा निर्माण ही एक महत्वाची शाखा आहे. बांगलादेश सदभावना यात्रेचे संपूर्ण आयोजन-नियोजन त्यांनी केले होते. शंभर सायकलवीर या यात्रेत सहभागी होते. वाटेत प्रत्येक ठिकाणचे निवास,भोजन, औषधउपचार, प्रत्येक राज्यातील सामाजिक संस्था यांच्याशी समन्वय त्यांनी साधत भारतातील पाच राज्ये आणि बांगलादेश मधील नवलाखी पर्यंत सदभावना सायकल यात्रा यशस्वीपणे पार पाडली.

यात्रा संपल्यानंतर कोलकात्यात पुन्हा येत तेथून विविध मार्गांनी सायकलपटूंना रवाना करण्यात आल्यानंतर विशाल अहिरे, अजय वाबळे, संतोष धर्माधिकारी आणि योगेश जाधव हे सोबत नेलेली स्नेहालयच्या एम्ब्युलन्स मधून अहमदनगर कडे निघाले होते. दरम्यान ओरिसा राज्यातील भुवनेश्वर जवळ रात्री दोन-अडीचच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात विशाल अहिरे गंभीर जखमी झाले, इतर तिघेही जखमी झाले. मात्र दुर्दैवाने विशाल यांचा मृत्यू झाला. जखमी असलेले अजय वाबळे, संतोष धर्माधिकारी आणि योगेश जाधव यांच्यावर कलकत्यात उपचार सुरू आहेत.

विशाल अहिरे यांचे शव अहमदनगर कडे आणण्यात येत आहे, सोबत स्नेहालयचे डॉ गिरीश कुलकर्णी, श्याम असावा आणि भाऊ मनोज अहिरे आहेत अशी माहिती स्नेहालयचे हनिफ तांबोळी यांनी दिली आहे. अंत्यविधीला अहमदनगर अथवा श्रीरामपूर इथे होऊ शकतो. साधारण आज रात्री आठ वाजेपर्यंत शव अहमदनगर पोहचेल असेही हनिफ तांबोळी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here