श्रीगोंदा प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे एका डॉक्टरने सख्खा भावावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले पथकासह घटनास्थळी हजर झाले.

डॉ. विजय देवीचंद मुनोत आणि मनोज देविचंद मुनोत या दोन भावांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हा गोळीबार झाला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ढिकले यांनी दिली आहे. डॉ. विजय मुनोत यांनी मनोज मुनोत यांच्यावर रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या झाडल्या असून एक गोळी मांडीला तर दुसरी गोळी पोटाला लागली आहे. मनोज मुनोत यांना उपचारासाठी दौंड येथील पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती खालावल्याने पुणे येथे उपचारासाठी पाठवावे असे पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

काष्टी येथे विजय मुनोत यांचा वैद्यकिय व्यावसाय आहे तर मनोज मुनोत यांचा किराणा विक्रीचा व्यावसाय आहे. डॉ. विजय मुनोत यांचे हॉस्पीटल असून त्याच्याच समोर मनोज मुनोत यांचा किराणा विक्रीचा व्यावसाय आहे. बुधवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान मनोज मुनोत यांच्या दुकानात विक्रीचे साहित्य घेऊन एक टेम्पो आला होता. टेम्पो चालकाने सदर टेम्पो डॉ. मुनोत यांच्या हॉस्पीटलसमोर उभा केला होता. टेम्पो माझ्या दवाखान्यासमोर का उभा केला असले म्हणून डॉ. विजय मुनोत यांनी मनोज मुनोत यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर दोन्ही भावांमध्ये झटापट झाली. याचवेळी मनोज मुनोत यांनी डॉ. विजय मुनोत यांच्या डोक्याला मारहाण केल्याने ते जखमी झाले तसेच डॉ. विजय मुनोत यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने मनोज मुनोत यांच्यावर गोळीबार केला. डॉ. विजय मुनोत यांनी रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या मनोज मुनोत यांच्यावर झाडल्या असून एक गोळी मांडीला तर दुसरी गोळी पोटाला लागली आहे.

पोलिस निरीखक रामराव ढिकले यांना घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी हजर झाले. जखमी डॉ. विजय मुनोत यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले आहे तर मनोज मुनोत यांची प्रकृती खालावत चालल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. ज्या रिव्हॉल्वरमधुन गोळीबार करण्यात आले ते जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here