अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरील पाथर्डी तालुक्यातील करंजी गावापासून एक किलोमीटर अंतरावरील भावले वस्तीवर शुक्रवारी रात्री सशस्त्र दरोडा पडला. या हल्ल्यात चोरटय़ांनी केलेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

दरोडेखोरांच्या मारहाणीत गोपीनाथ लक्ष्मण भावले (वय वर्षे 80) यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी शांताबाई गोपीनाथ भावले (वय वर्षे 76) यादेखील या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपाधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी घटनास्थळी येऊन तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांची पथके याबाबत तपासबाबत गुन्हेगारांचा शोध घेत आहे.

दरोड्यावेळी भावले वस्तीवर घरामध्ये गोपीनाथ लक्ष्मण भावले आणि शांताबाई गोपीनाथ भावले हे दोघेच होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठा ऐवज चोरीला गेलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here